संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपी तैनात करावी

भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांची प्रशासनाकडे मागणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत लॉकडाऊन केवळ सरकारी आदेशावरच राहिला असून, कोणीही कधीही आणि कोठेही जात आहे. त्यामुळे मुंब्रा व वागळे इस्टेटप्रमाणेच संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल (आरएएफ) किंवा एसआरपीच्या तुकड्या तैनात कराव्यात, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात वेगाने `कोरोना’चा फैलाव होत आहे. सुरुवातीपासून हॉट स्पॉट ठरलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्य नगर-सावरकर नगर आणि मुंब्रा क्षेत्रातून नागरिकांची शहराच्या विविध भागात ये-जा सुरू होती. त्याचा फटका संपूर्ण ठाणे शहराला बसला आहे. त्यामुळे राज्यात मुंबईपाठोपाठ ठाणे शहराचा क्रमांक आला आहे. लॉकडाऊन-४ च्या अखेरच्या टप्प्यातही शहरातील कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे, असे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल व पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
वागळे इस्टेट व मुंब्रा क्षेत्रात शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पोलिसांनी घेतला. त्यामुळे बेशिस्त नागरिकांवर जरब निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होऊ शकेल. त्याच धर्तीवर संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत आरएएफ किंवा एसआरपीच्या तुकड्या केल्यास बेशिस्त नागरिकांवर जरब बसू शकेल. त्यामुळे लवकरात लवकर शहरात तुकड्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेवक डुंबरे यांनी केली आहे.

 908 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.