स्थानिकांच्या हरकती आणि सूचनेनंतरच देयके अदा करा


नालेसफाईतील घोळावर इंटक काँग्रेसचे बोट

ठाणे : नालेसफाई झाल्यानंतर  ठेकेदाराकडे अहवाल मागवून तो त्या-त्या प्रभाग समिती कार्यालयात अवलोकनार्थ ठेवावा.त्यावर स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवून या माहितीनंतरच ठेकेदाराचे बील अदा करण्यात यावे,अशी मागणी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली आहे.
          नालेसफाईबाबत ठाणेकरांचा आतापर्यंतचा अनुभव वाईट आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईचा दरवर्षी पूर्ण बोजवारा उडालेला दिसतो. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही जागोजागी पाणी तुंबते.नालेसफाईत कोणतीही पारदर्शकता दिसत नाही. आजवर केवळ अधिकारीवर्गाने दिलेल्या अहवालानुसारच त्या-त्या ठेकेदारांना देयके अदा करण्यात येत आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या नालेसफाईनंतरही ठाणेकरांचा पैसा वाया जात असल्याचे मत शिंदे यांनी आयुक्त विजय सिंघल यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

यापुढे नालेसफाईत घोळ होवू नये यासाठी  स्थानिक पातळीवर नागरीकाच्या सूचना आणि हरकती मागवाव्यात. ठेकेदारांचा  अहवाल आणि नागरिकांच्या हरकती याचा अभ्यास करुनच ठेकेदारांना त्यांची बिले देण्यात यावीत, अशी मागणी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली आहे. नालेसफाई त्या-त्या भागातील स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या-आरोग्याच्या दृष्टीने करण्यात येत असल्याने या कामांबाबत त्यांच्या सूचना आणि हरकतीचा आदर होणे क्रमप्राप्त ठरते. याकरिता महानगरपालिकेने या मागणीचा गांभिर्यपूर्वक विचार केला पाहिजे, असे सचिन शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.याबाबत कायदेशीर अभ्यास करून जनहित याचिका दाखल करता येईल का?याबाबत विचार चालू असल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.

 358 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.