करोनामुक्‍त ठाण्‍यासाठी सरसावल्‍या रा.स्‍व.संघ जनकल्‍याणसमितीच्‍या करोना योध्‍दया

महिला टिमने पिंजुन काढला चेंदणी कोळीवाडा हॉटस्‍पॉट

ठाणे : करोना मुक्‍त ठाण्‍यासाठी आपल्‍या तीनशे कार्यकर्ते, ३२ डॉक्‍टर, १८ नर्सेसच्‍या माध्‍यमातुन ठाणे शहरातील हॉटस्‍पॉट भागात कार्यरत असलेल्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या जनकल्‍याण समितीच्‍या कामात महिला टिमने देखील आपले कर्तव्‍य बजावले आहे. गेल्‍या चार दिवसांपासुन या महिला करोना योध्‍दयांनी चेंदणी कोळीवाडा हा हॉटस्‍पॉट भाग पिंजुन काढला. फीवर ओपीडी, औषध वाटप, घरोघरी सर्वेक्षण अशा माध्‍यमातुन करोनाची साखळी तोडण्‍याचे काम या महिला टिम करीत आहेत.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे तीनशे कार्यकर्ते, ३२ डॉक्‍टर, १८ नर्स, ११ राहत केंद्राच्‍या मदतीने ठाणे महानगरपालिका भागातील इंदिरा नगर, हनुमान नगर, रूपादेवी पाडा, राम नगर, किसन नगर, लोकमान्‍य नगर, परेरा नगर, चेंदणी कोळीवाडा या भागा‍त गेल्‍या दोन महिन्‍यापासुन करोना मुक्‍त ठाणे हे अभियान राबवित आहेत. आत्‍तापर्यंत २५ हजार लोकसंख्‍येपर्यंत जनकल्‍याण समितीचे स्‍वयंसेवक पोहचले आहेत. यात त्‍यांनी १ हजाराहून अधिक फीवर रूग्‍ण तपासले, ३६६ ताप असलेल्‍या रूग्‍णांवर प्राथमिक उपचार केले. तर पन्‍नासहून अधिक करोना रूग्‍णांना शोधण्‍यात यश मिळवले आहे.

एकीकडे करोनाची साखळी तोडण्‍यासाठी सर्वेक्षण, फीवर क्‍लीनिक चालवणे, संशयित रूग्‍णांना क्‍वारंटाईनसाठी पाठवणे आदी कामे जनकल्‍याण समितीच्‍या माध्‍यमातुन सुरू असतांना दुसरीकडे नागरिकांची प्रतिकार शक्‍ती वाढावी म्‍हणून शहरातील मुंब्रा, कळवा खारेगांव, विटावा, ठाणे पुर्व, नौपाडा, खोपट, वृंदावन, वागळे, लोकमान्‍य, पोखरण, मानपाडा, वडवली यासह विविध भागात हजारहून अधिक कुटूंबांना आयुर्वेदिक काढा भरड तर साडे सात हजारहुन अधिक लोकांना आयुष काढा टॅबलेटचे वितरण केले.

जनकल्‍याण समितीच्‍या पुरूष स्‍वयंसेवकांसोबत महिला चमुने देखील करोना मुक्‍त ठाण्‍याच्‍या कामात हिरारीने सहभाग घेतला आहे. चेंदणी कोळीवाडा या हॉटस्‍पॉट परिसरात गेल्‍या चार दिवसांपासुन महिला चमु काम करीत आहे. या महिला करोना योध्‍दयांनी या परिसरातील २००० घरातील ७२०० नागरिकांचे सर्वेक्षण करून तेथुन जवळपास शंभराहुन अधिक तापाचे रूग्‍ण शोधुन काढले. या टिमच्‍या सहकार्याने सुरू केलेल्‍या फीवर ओपीडीचा लाभ जवळपास दिडशे नागरिकांनी घेतला. याचसोबत या भागातील ७२०० इतक्‍या नागरिकांना प्रतिकारशक्‍तीवृध्‍दीच्‍या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप महिला टिमने केले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्‍त संदीप म्‍हाळवी यांनी आज प्रत्‍यक्ष हॉटस्‍पॉट भागात काम करीत असलेल्‍या या महिला चमुची भेट घेऊन त्‍यांचा उत्‍साह वाढविला.

करोना साखळी तोडण्‍यासाठी घरोघरी जात असतांना नागरिकांनी उत्‍साहाने स्‍वागत केले. उच्‍चशिक्षित मुली आपल्‍या काळजीपोटी आपल्‍या दारात घेऊन करोनाच्‍या उच्‍चाटनासाठी काम करीत असल्‍याचे पाहून नागरिक देखील चांगला प्रतिसाद देत होते. आमच्‍या घरातुन देखील आम्‍हाला प्रोत्‍साहन मिळाले, एरवी काळजीपोटी कुणी आपल्‍या मुलांना बाहेर सोडत नाही मात्र जनकल्‍याण समितीच्‍या मार्गदर्शनाखाली काम करण्‍यास जात असल्‍याने घरच्‍यांनी देखील आम्‍हाला काम करण्‍याची मुभा दिले अशी प्रतिक्रिया या महिला टिममधील सदस्‍यांनी व्‍यक्‍त केली.

 1,964 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.