शिक्षण विभागाची तयारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत
मुंबई : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची संख्या तरीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याचा भाग म्हणून रेड झोन वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सप्टेंबर किंवा ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र आता नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरु करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात सुतोवाच केले.
सद्यपरिस्थिती मुंबई शहर आणि महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र राज्यातील काही ठराविक भागातही कोरोनाचा प्रसार वाढताना किंवा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आणि रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरु करण्याचा विचार असून शहरी भागातील मुले हि ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेवू शकतात. मात्र ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य असेलच असे नाही. तसेच राज्याच्या अनेक भागात इंटरनेटची सुविधा असेल किंवा त्यांच्याकडे अत्याधुनिक फोनची सुविधा असेल असे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण पाहिले तर या आजारापासून प्रामुख्याने ५० वर्षो वयोगटापेक्षा पुढील व्यक्तींना, किंवा ज्यांना रक्तदाब, मधुमेह, दृदयाशी संबधित आदी आजार असणाऱ्यांनाच याचा धोका आहे. तसेच या आजाराची लागण लहान मुलांनो होत असल्याचे अद्याप तरी दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे ग्रामीण भागातील खाजगी आणि जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळा सुरु करण्यावाचून पर्याय नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षावर कोणत्याही परिणाम होणार नाही. या शाळा सुरू करताना प्रत्येक बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात येणार असून रोटेशन पध्दतीने विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येणार आहे. जेणेकरून शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खेळाची सुट्टी किंवा खेळाचा तास पुढील काही महिन्यांकरिता बंद करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
867 total views, 1 views today