अंबरनाथमध्ये ‘देशी’गायींचे गोकुळ


आत्मनिर्भरतेकडे मराठी तरुणाचे पाऊल

अंबरनाथ : ‘करोना’विषाणूचा जगभरात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यानंतर उद्भविलेल्या संकट काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आत्मनिर्भर होऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. मात्र तत्पूर्वीच अनेक तरुणांनी देशी उद्योगांकडे वळून आत्मनिर्भरतेच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. अंबरनाथ येथील अजय दसपुते त्यापैकी एक आहेत. जर्मनीमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी येथील शेतकी सोसायटीत दहा वर्षांसाठी जागा भाड्याने घेऊन राम कुडतरकर यांच्यासोबत भागिदारीत देशी गायींचा तबेला सुरू केला आहे.
श्रीकृष्णाच्या गोकुळातील वास्तव्यातील गोवर्धन पर्वताची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. प्रत्यक्षात ते ’गोबरधन आहे. गाईचे दूध, दुधापासून बनणारे पदार्थ हे अमूल्य आहेच, याशिवाय शेण, गोमूत्र हे सुद्धा बहुमूल्य आहे. मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. देशी ‘गोधना’चे हे महत्त्व ओळखून अजय दसपुते आणि त्याच्या मित्राने गायींचे संगोपन सुरू केले आहे.
सध्या अंबरनाथ पूर्व विभागात शेतकी सोसायटीतील त्यांच्या गोठ्यामध्ये सात गायी, एक बैल आणि चार वासरे आहेत. लवकरच आणखी काही गायी तबेल्यामध्ये येणार आहेत. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी हा गोठा भाड्याने घेऊन अजय दसपुते यांनी हा व्यवसाय सुरू केला. सध्या या गोठ्यातून अंबरनाथ, उल्हासनगर, आणि बदलापूर परिसरातील ७५ ग्राहकांना ‘अ-२’दर्जाच्या दूधाचे वितरण होते. कपिला, डांगी, खिल्लारी, गौळव या देशी जातीच्या या गायी आहेत. दुधाव्यतिरिक्त दही आणि तूपाचीही उपलब्धतेनुसार विक्री होते. काचेच्या बाटल्यांमधून अतिशय सुरक्षितरित्या दूध घरोघरी पोहोचविले जाते. त्यासाठी एक सेवक नेमला आहे.
दुध आणि दुग्धजन्य पदार्थांंव्यतिरिक्त शेणखत, शेणाच्या लाद्याा (शेणी), गोमूत्र हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपयुक्त घटकही तबेल्यामध्ये तयार होतात. ‘अग्निहोत्र’करण्यासाठी सुकलेल्या शेणाच्या वड्या उपयुक्त ठरतात. ते सकाळ-संध्याकाळ जाळल्याने परिसरातील वातावरण शुद्ध होते. गायीच्या शेणात ३५ टक्के ऑक्सिजन असते. ते वाळवून त्याच्या शेणी केल्यावर त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ४५ टक्के इतके होते. त्या शेणी जाळल्यावर तयार होणाऱ्या धुरावाटे ५५ ते ८० टक्के ऑक्सिजन हवेत सोडला जातो, अशी माहिती अजय दसपुते यांनी दिली. या तबेल्यात घरात जाळण्यासाठी विविध आकाराच्या शेणकांडी, शेणाच्या वड्या तसेच नैसर्गिक कीटकनाशक जीवामृतही बनविले जाते. शेणखतही गरजेनुसार लोकांना दिले जाते. तबेल्यातच मक्याची लागवड करून गायींसाठी हिरवा चारा मिळविला जातो. याशिवाय सकाळ-संध्याकाळ गायींना सकस आहार दिला जातो.

लोकांना सकस आणि पर्यावरण स्नेही उत्पादने देण्याचा प्रयत्न

केवळ पैसे कमविणे हाच उद्देश असता, तर जर्मनीतील नोकरी सोडून हा उद्योग पत्करला नसता. देशी गायींचा गोठा सुरू करण्यामागे लोकांना सकस आणि पर्यावरण स्नेही उत्पादने उपलब्ध करून द्याावीत, हा उद्देश होता. त्यात मी नक्कीच यशस्वी ठरतोय. या चांगल्या कामाला मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यांचा मी आभारी असल्याचे गोठा चालक अजय देसपुते म्हणाले.संपर्क-७८४१८६०८२५.

 1,230 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.