जगतसिंग गिरासे यांनी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली


अठ्ठावीस वर्षातील अकरावे प्रशासक

बदलापूर : कुळगाव बदलापूर पालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे उल्हासनगर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी आहेत. समन्वय, सहकार्य आणि आवश्यक उपाययोजना करून कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्याचा निर्धार जगतसिंग गिरासे यांनी व्यक्त केला आहे. पालिकेच्या २८ वर्षांच्या इतिहासात गिरासे हे अकरावे प्रशासक ठरले आहेत.
१४ एप्रिल १९९२ रोजी बदलापूर नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. काही महिन्यांनी या पालिकेचे कुळगाव बदलापूर नगरपरिषद असे नाम विस्तार करण्यात आले. यु. पी. एस. मदान हे पहिले प्रशासक होते. त्यानंतर पद्माकर भंडारी, विठ्ठलराव अवताडे, आर. डी. शिंदे यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. १० मे १९९५ रोजी बदलापूर पालिकेत पहिली लोकप्रतिनिधींची कारकीर्द सुरु झाली. शिवसेनेचे मनोहर आंबवणे हे पहिले नगराध्यक्ष झाले. ९ मे २००० आणि १० मे २००० असे दोन दिवस यशवंत कुलकर्णी यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. जयप्रकाश टांकसाळकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर बि. एल. गिरी हे २० ऑगस्ट २००१ ते ४ सप्टेंबर २००१ या कालावधीत प्रशासक होते. राजेंद्र घोरपडे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर १६ डिसेंबर २०११ ते २३ डिसेंबर २०११ या कालावधीत नितीन मुंडावरे यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. जयश्री मुकुंद भोईर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ ते १० डिसेंबर २०१३ या कालावधीत बी. जी. गावंडे यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडली. उषा तुकाराम म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ११ मे २०१५ ते १८ मे २०१५ पर्यंत डॉ. धनंजय सावळकर हे प्रशासक होते. विजया मोहन राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ६ मार्च २०१९ ते २ मे २०१९ याकालवधीत उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी पालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली होती. आता एड. प्रियेश जाधव यांचा कालावधी संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक अपेक्षित होती. मात्र कोरोनाच्या या महामारी मुळे सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित कालावधी साठी पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा एकदा उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी पालीकेच्या प्रशासक पदाची जबाबदारी हाती घेतली आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन नगराध्यक्ष निवडून येई पर्यंत उपविभागीय अधिकारी हे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्या महत्वाच्या आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत कारवाई करावयाची आहे. यादरम्यान शहरात जे रुग्ण आढळतील त्यांना तात्काळ आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, त्यासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्था पूर्ण करणे हि आपली प्राथमिक जबाबदारी राहील. शासनाच्या आलेल्या आदेशांची अमलबजावणी करणे, सर्व पालिका अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने पालिका प्रशासना मध्ये आलेल्या या संकटाला सुसज्जपणे समर्थपणे सामोरे जाणे यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच नजीकच्या काळात येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषन्गाने शहरात आवश्यक कामे करणेसाठी आपण प्रयत्नशील राहू. दैनंदिन प्रशासन कामकाजासाठी आवश्यक गोष्टीसाठी समन्वय, सहकार्य आणि आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणे या गोष्टीला आपले प्राधान्य राहील अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी व्यक्त केली आहे.

 380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.