दिड महिन्यापासून भुयारी मार्ग बंद

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल
बदलापूर : कोरोनाची संचार बंदी लागू झाल्यापासून बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बेलवली येथील भुयारी मार्ग पाणी साचल्यामुळे बंद झाला आहे. परिणामी बदलापूर पूर्व आणि पश्चिमेकडून ये जा करणार्यांना फार मोठा वळसा घाला लागत आहे. पश्चिमेकडील राहणाऱ्या नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना कात्रप येथील ग्रामीण रुग्णालयात जाताना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. पालिका प्रशासन हा भुयारी मार्ग दुरुस्त करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दीड महिन्यातहून अधिक काळ हा भुयारी मार्ग बंद झाला आहे. या भुयारी मार्गात सांडपाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने त्याची दुर्गंधी आजूबाजूला पसरलेली आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी पसरून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिक देखील हैराण झाले आहेत.
बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बेलवली येथील भुयारी मार्गात गेल्या दिड महिनन्या पासून सांडपाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाणी भरत असल्याने हा मार्ग सातत्याने बंद होतो. मात्र कारमेल आणि फातिमा या दोन्ही शाळेतील बस चालक हे आपल्या स्वखर्चाने गेल्या काही महिन्यांपासून हा भुयारी मार्ग सुरू राहावा यासाठी मोटर लावून येथील पाणी काढत होते. त्यांना नगरपालिका प्रशासनाचे पाहिजे तितके सहकार्य मिळत नव्हते.
कोरोना संचार बंदी मुले सर्व शाळा बंद आहेत. या काळात बस सेवा देखील बंद असल्याने आता हे बस चालक मोटर लावून पाणी काढत नाहीत. रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या या भुयारी मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे सर्वसामान्य बदलापूरकरांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी आणि नागरिकच वाहनांचा वापर करत आहेत. बदलापूर पश्चिमेकडील तसेच ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना कात्रप येथील ग्रामीण रुग्णालयात जायचे आहे त्यांच्यासाठी हा भुयारी मार्ग फार उपयोगाचा आहे. मात्र या ठिकाणी पाणी भरल्याने हा भुयारी मार्ग सुमारे दिड महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कात्रप रुग्णालयात जाणाऱ्यांना नाहक शहराला पूर्ण वळसा घालून जावे लागत आहे. भुयारी मार्गात सांडपाणी साठल्याने या परिसरात घाणीचे आणि दुर्गंधी साम्राज्य पसरले आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता वाढली आहे.
या भुयारी मार्गातील सांडपाणी लवकरात लवकर काढून तेथे कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी आणि हा भुयारी मार्ग वाहूतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.