ठामपाचे ७० टक्के आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात


आरोग्य अधिकारी माळगावकर यांना बडतर्फ करा-मिलींद पाटील

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. या कोरोनाच्या महामारीमध्ये जीवावर उदार होऊन सेवा बजवणार्‍यांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “कोविड योद्धा” असा केला आहे. मात्र, सैन्य रसदेवर चालते, याचाच विसर ठाणे महानगर पालिकेला पडला असल्याचे दिसून येत आहे. आपल्या जीवाची काळजी न करता काम करणार्‍या डॉक्टर्ससह या आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने तर दिली जातच नाहीत; शिवाय त्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ७० टक्के आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या सर्व प्रकाराला ठामपाचे मुख्य आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर हेच जबाबदार असल्याने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.
कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेते कार्डीया रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही.तर, सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. तसेच, विविध आरोग्य केंद्रातील नर्स, वॉर्ड बॉय हे कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे, स्क्रिनिंग आदी कामे करीत आहेत. तर, विविध आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स प्रचंड धोका पत्करुन थेट रुग्णांच्या संपर्कात जात आहेत. त्यांनाही वेतन देण्यात आलेले नाही.
उष्मा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जो भाग प्रतिबंधीत (कॅन्टोन्मेंट) केला आहे. तेथेही हे कर्मचारी जीवावर उदार होऊन जात आहेत. त्यांना साधा एन ९५ चा मास्कही दिला जात नाही. साधा एक मास्क दिला जात आहे. हँडग्लोव्हज, हँडसॅनिटायझर, सर्जिकल कॅप किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची साधने दिली जात नाहीत. त्यातच विभागांमध्ये विविध आरोग्य सर्व्हे करणार्‍या नर्स या ४५ वयाच्या पुढील आहेत. हा सर्वे केल्यानंतर त्या थेट आपल्या घरात जात आहेत. तर डॉक्टर्ससाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर आवश्यक असतानाही त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासह या नर्स आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्याची कोणतीही जाणीव डॉ. माळगावकर यांना नाही.
या कर्मचार्‍यांना वेतनही अदा केले जात नाही. त्यामुळे डॉक्टर्ससह गोरगरीब नर्स, आशा स्वयंसेविका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक, यांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉ. माळगावकर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मिलींद पाटील यांनी केली आहे.

 520 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.