प्रतिकुल परिस्थितीतही रुग्णोपयोगी साहित्य निर्मिती
अंबरनाथ : सध्या अन्नधान्य आणि औषधांबरोबरच रुग्णोपयोगी साहित्य अत्यावश्यक ठरत असून औद्योगिक विभागात युद्ध पातळीवर त्यांचे उत्पादन घेतले जात आहे. ‘करोना’मुळे उद्भविलेल्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याला तोंड देण्यासाठी वैद्याकीय क्षेत्रातील सर्व संबंधित रात्रंदिवस काम करीत आहेत. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ठिकठिकाणी विशेष कोव्हीड रुग्णालये उभारली जात असून त्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या फर्निचर्सला सध्या खूप मागणी आहे. संचारबंदीमुळे कच्चा माल मिळण्यात निर्माण होत असलेल्या अडचणी आणि अपुरे कर्मचारी या प्रतिकुल परिस्थितीत वेळेत रुग्णालय साहित्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान उद्योजकांपुढे आहे.
रुग्णालयात लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या खाटा, टेबल्स, सलाईन स्टॅन्ड, लॉकर्स, शल्य चिकित्सा कक्ष आणि अतिदक्षता विभागातील फर्निचरची निर्मिती करणाऱ्या मेडिमेक इंडस्ट्रिजच्या व्यवस्थापकांनी कंपनीतच त्यांच्या कामगारांच्या निवासाची व्यवस्था करून उत्पादन प्रक्रियेत खंड पडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यांच्याकडे सध्या देश विदेशातील कोव्हीड रुग्णालयात साहित्य पुरविण्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या पर्वात इतर उद्योगांप्रमाणे त्यांचीही कंपनी बंद होती. मात्र काळाची गरज लक्षात घेऊन गेल्या महिन्यापासून परवानगी घेऊन आनंद नगर विभागातील ‘मेडिमेक’च्या दोन्ही कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू आहे.
देशविदेशातील रुग्णालयांना लागणारे विशिष्ट प्रकारचे फर्निचर बनविणाºया ‘मेडिमेक’मध्ये सध्या मुंबई-ठाण्यातील रुग्णालयांप्रमाणेच भूतान येथील कोव्हीड रुग्णालयासाठी साहित्य निर्मिती सुरू आहे. सध्या मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांसाठी दोन हजार सलाईन स्टँन्ड, शासनाच्या मागणीनुसार २०० खाटा आणि लॉकर्स, तसेच भूतान येथे १८ खाटा तयार केल्या जात आहेत. सध्या ‘करोना’मुळे सॅनिटायझरचा वापर अनिर्वाय ठरला असून ते ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या स्टॅन्डनाही सध्या बरीच मागणी आहे.
रुग्णालयांसाठी विशिष्ट प्रकारचे फर्निचर लागते. उपलब्ध असलेली जागा आणि आवश्यतकेनुसार ते बनविले जाते. सध्या मागणी तर खूप आहे. मात्र संचारबंदीमुळे कच्चा माल मिळण्यात अडचणी आहेत. कारण बरेचसे पुरवठादार मुंबईत आहेत. त्यामुळे अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार पाडून माल मिळवावा लागत आहे. कच्चा माल सुलभपणे उपलब्ध झाल्यास आम्ही निश्चितच पू़र्ण क्षमतेने काम करून अधिक उत्पादन घेऊ. आमच्या दोन कंपन्यांमधून एकुण १४० जण काम करतात. सध्या त्यापैकी ८५ कामगार सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५ कामगारांची कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना दोन्ही वेळचे जेवण, चहा नाश्ता दिला जात असल्याची माहिती मेडिमेक इंडस्ट्रिजच्या मिलिंद चौधरी यांनी दिली.
708 total views, 1 views today