महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची “लाख” मोलाची मदत

या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे एक लाख रुपये जमा करून अन्नधान्य, तेल, कांदे-बटाटे इ. साहित्य वाटपासाठी उपलब्ध करून दिले.

बदलापूर : मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लव्हाळी (मुरबाड रोड, बदलापूर) येथे १५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे एक लाख रुपये जमा करून अन्नधान्य, तेल, कांदे-बटाटे इ. साहित्य वाटपासाठी उपलब्ध करून दिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या मदतीमुळे ग्रामीण भागातील बागरिकही भारावून गेले.
कोरोनामुळे खेड्यात राहणाऱ्या अनेक कुटुंबांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शासनाकडून रेशनच्या दुकानातून मिळणाऱ्या वस्तू दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. रोजंदारीवर काम करणारा फार मोठा वर्ग लॉकडाऊनच्या काळात त्रस्त झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत देशाचे भविष्य असलेल्या तरुणाई जिद्दीने या गरजू लोकांसाठी एक लढा उभारत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी लॉकडाऊनच्या काळात सुमारे ९०० गावकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. प्राचार्या डॉ. सोनाली पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यक्रम अधिकारी निखिल कारखानीस यांच्या देखरेखीखाली पार पडला. शिवभक्त आश्रम शाळेचे संचालक रमेश बुटेरे आणि मुख्याध्यापिका सौ. सायली बुटेरे यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळाले.
“समाजातील विविध लोकांच्या प्रति असलेल्या जबाबदारीचे भान विद्यार्थ्यांनी दाखविले, यासाठी त्यांचा फार अभिमान वाटतो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवित राहू असे निखिल कारखानीस,( कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. आमच्या महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि विशेषतः माजी विद्यार्थी यांनी मानवतेच्या परीक्षेत आज विशेष प्रावीण्य मिळवलं. जेव्हा समाजातील दीन-दुबळ्या घटकांची यथायोग्य काळजी घेतली जाईल तेव्हाच आपलं राष्ट्र प्रगतीपथावर असेल. इतिहास रचण्याची आपल्यासमोर संधी आहे, आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारे आपण योगदान देऊ या” असे आवाहन मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पेडणेकर यांनी केले. –

 526 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.