ठाण्यातील खासगी रूग्णालयांच्या मनमानीला चाप

अवाजवी बिल आकारणाऱ्या तक्रारींसाठी प्रभाग समिती स्तरावर समिती
नागरिकांच्या तक्रारीवर होणार विनाविलंब कार्यवाही

ठाणे : कोरोना कोव्हीड १९ बाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रूग्णालय व्यवस्थापनांकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी बिल वसूल करत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अवाजवी बिल वसुल करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची अडवणूक टाळण्यासाठी परिमंडळ स्तरावर समिती गठित केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ मे रोजीच्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही समिती गठित केली आहे.

त्या त्या परिमंडळाचे उपायुक्त हे त्या समितीचे अध्यक्ष असून वैद्यकिय आरोग्य अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष किंवा सचिव आणि संबंधित रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी आदींचा या समितीमध्ये समावेश आहे.

सदर समिती ही खासगी रूग्णालयाने महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरांपेक्षा अवाजवी दराने आकारणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरानुसार बिलाची आकारणी करण्याबाबत विनाविलंब कार्यवाही करणार आहे. त्याचबरोबर अनेकवेळा खासगी रूग्णालय व्यवस्थापनाकडून बेडस् उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर समिती ही नागरिकांची अडवणूक होणार नाही याबाबत प्राधान्याने काम करणार आहे.

 441 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.