आयुर्वेदाचार्य डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीवर नियुक्ती

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांची समिती उपचारासाठी उपाय योजना करणार

 
 पनवेलः महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष तथा कांतीलाल प्रतिष्ठान रायगडचे उपाध्यक्ष, आयुर्वेद औषधांचे निर्माते डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची राज्य शासनाने कोविडच्या रूग्णांवरील उपचाराकरीता आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग चिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्यासाठी टास्क फोर्स ऑन आयुष समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी काढले आहेत.
 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपचार पद्धतीचा अवलंब करण्याची तयारी सुरू ठेवली आहे. त्यातूनच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांची एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. अमित दवे यांना सदस्यत्व देण्यात आले आहे. डॉ. दवे यांची पाचवी यशस्वी पिढी आयुर्वेदात कार्यरत असून पनवेलपासून साता समुद्रपार देश, विदेशात त्यांच्या दवे कुटूंबाचे आयुर्वेद प्रचार व प्रसार आणि उपचारात मोठे योगदान आहे.
 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अलाक्षणिक तसेच अल्पलाक्षणिक उपचारांकरीता आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग चिकित्सा पद्धतीचा अवंलब करण्यासाठी कोविड टास्क फोर्स समिती तयार करण्यात आली आहे.
 वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली हे सहअध्यक्ष असतील. आयुषच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहाय्यक संचालक डॉ. सुभाष घोलप हे सचिव असतील. मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, आयुर्वेद चिकित्सक प्रा. हरिश बी. सिंग, आर्युेवेद चिकित्सव व डॉ. कुलकर्णीज आरोग्यधामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय कुलकर्णी, अभिनव फार्माचे सीईओ डॉ. संजय तामोळी, होमिओपॅथी चिकित्सक व माईंड टेक्नॉालॉजिज आणि वेलकम क्युअरचे संस्थापक डॉ. जवाहर शाह, एमबीबीएस, एमडी व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील, युनानी चिकित्सक  तथा माजी उपाध्यक्ष भारतीय चिकित्सा केंद्रिय परिषदचे डॉ. झुबेर शेख तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुणे आळंदी येथील होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासोबत पनवेलचे आयुर्वेदाचार्य तथा औषध निर्माते डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची नियुक्ती केली आहे.
 
 डॉ. दवे यांनी मानले आभार
 
 डॉ. अमित दवे यांची राज्य शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यपदी निवड होताच, त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहूल गांधी, राज्याचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका आदींना धन्यवाद दिले आहे. 

 415 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.