पालकमंत्र्यांच्या आदर्श गावातील रस्त्याच्या कामात लोढा बिल्डरचा खोडा

शासकीय योजनेतील रस्ता बिल्डरने उखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट

कल्याण : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या आदर्श वाकलण गावामधील २५१५ योजनेतून मंजूर रस्त्याचे काम चालू असताना लोढा बिल्डरने लॉकडाऊनच्या काळात उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून जनहिताच्या कामामध्ये खोडा घालणाऱ्या लोढा बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास २५१५ योजनेतून वाकलण ते सिद्धीकरवले (तळोजा एमआयडीसी) रस्त्याकरिता २५ लक्ष रुपये मंजूर झाले असून सदर रस्त्याचे काम चालू आहे. मात्र या रस्त्यामध्ये शंभर मीटरची खाजगी जागा येत असल्याचे लोढा बिल्डरचे म्हणणे आहे. सदर रस्त्यावर यापूर्वी सन २०१७-१८ या वर्षात २५१५ योजनेमधूनच ३७ लक्ष रुपये खर्च करून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे अभियंताने ग्रामपंचायतीकडे विचारणा करण्यात आली असता ग्रामपंचायतीने सर्व जागा शासकीय असल्याचे सांगितले होते. त्यानुसार यापूर्वी हा रस्ता बनविण्यात आला होता. त्यावेळी कोणतीही अडचण नव्हती. आता मात्र लोढा बिल्डरने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता उखडून दोन्ही गावांचा मार्गच बंद केला आहे.

ग्रामीण भागातील जमिनींचे महत्व ओळखून लोढा बिल्डरने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या. जमिनी विकत घेईपर्यंत गावकऱ्यांशी सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या लोढा बिल्डरने आता मात्र सामाजिक हिताच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रताप सुरु केला आहे. यापूर्वी देखील वडवली व शिरढोण गावांना जोडणारा नवीन रस्ता तयार करताना देखील काम सुरु असताना रस्ता खोदल्याने अद्याप रस्त्याचे काम बंद आहे. गावकऱ्यांनी केवळ समाजहित म्हणून पूर्वी अनेक गावामधून रस्त्यांचे जाळे विणत असताना विनामोबदला आपल्या जमिनी दिल्या आहेत. मात्र केवळ शंभर मीटर जागेसाठी संपूर्ण गावांचा रहदारीचा मार्ग बंद करून लोढा बिल्डरने जनतेचा रोष ओढवून घेतला आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून गावे जोडण्यावर भर दिला. त्यानुसार शासनाच्या विविध योजनांमधून उत्तरशीव नागाव, वडवली शिरढोण, उत्तरशीव खिडकाळी, नारिवली वडवली अशी अनेक गावे जोडण्यात आली. त्याचप्रमाणे दहिसर ते वाकलण रस्त्याचे काम देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून एमआरडीए मार्फत दोन कोटी रुपये मंजूर असून नावाली निघू बामाली वाकलण या गावच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण होणार असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. सदर काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. अशाच पद्धतीने वाकलण ते सिद्धीकरवले जोडण्यात येत होता. तळोजा एमआयडीसी व कल्याण ग्रामीण भागातील वीस ते पंचवीस गावांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा रस्ता मानला जात आहे. या रस्त्याने असंख्य नागरिक तळोजा एमआयडीसी मध्ये नोकरी व्यवसायाकरिता ये – जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्याचा वापर मोठा आहे. सदर रस्ता खोदल्याने गावकरी लोढा बिल्डरच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याच्या पावित्र्यात आहेत.त्यामुळे सदर खोदलेल्या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व रस्ता पूर्ववत करून नागरिकांचा रहदारीचा मार्ग खुला करण्यात यावा अशी मागणी रमेश पाटील जिल्हापरिषद सदस्य ठाणे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 452 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.