कोरोना रुग्णांना ‘कोविड योद्धा योजना’ लागू करा

आरोग्य विमा कवच, लघु उद्योगासाठी २५ लाखांचे अर्थ सहाय्य, नोकरीत प्राधान्य देण्याची पनवेल संघर्ष समितीची मागणी

पनवेल : राज्यातील कोरोनोबाधित रुग्ण आणि त्यांच्या कोविड कुटुंबासाठी ‘कोविड योद्धा योजना’ त्वरित लागू करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्या पत्राच्या प्रती त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना पाठविल्या आहेत.
कोरोना रुग्णांना भविष्यात सन्मानाने जगता यावे, त्यांच्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन अपराधीपणाचा राहू नये यासाठी शासनाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या साक्षरीने त्यांना कोविड योद्धा किंवा कोविड कुटुंब हे प्रमाणपत्र द्यावे.
राज्य सरकारने ही योजना लागू करून राज्यातील कोरोना रुग्णांना विम्याचे कवच द्यावे. त्याचे सर्व हफ्ते शासनाने द्यावेत. त्या योद्ध्यांवर तहयात विमा कवचातून मुंबई, उपनगरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये आवश्यकतेनुसार भविष्यात उदभवणाऱ्या आजारांवर उपचार करावेत. रुग्णांना लघु उद्योगासाठी योजनेद्वारे २५ लाखांचे अर्थसहाय्य शासनाने करावे. ज्यांना लघु उद्योग करण्याची इच्छा नसेल आणि नोकरी करायची असेल त्यांना प्राधान्याने नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत. राज्यात कुठेही घर नसलेल्या कोविड योद्ध्याला सरकारी कोट्यातून घर देण्यात यावे. त्यासाठी म्हाडा, सिडको आणि गृहनिर्माण महामंडळात त्यांच्यासाठी आरक्षित घरे ठेवण्यात यावीत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवा, बेस्ट बस आणि विविध महापालिका, नगरपालिकेच्या परिवहन बस सेवेतून राज्यभर विनामूल्य प्रवास करण्यासाठी शासनाने योजनेंतर्गत पास द्यावेत, अशा महत्वाच्या मागण्या पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रांतून केल्या आहेत.
सामाजिक भान ठेवून ही योजना राज्य सरकारने सुरू केल्यास जगभरात मानवतेचा नवा संदेश आणि आदर्श निर्माण होईल, असा दावा कडू यांनी केला आहे. राज्य शासनाने विचार करावा आणि विरोधी पक्षाने ही योजना लागू करण्यास राज्य सरकारला प्रवृत्त करावे, अशी विनंती केली आहे.

 384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.