अंबरनाथ मधील शेकडो कारखाने सुरु


घर वापसी नाहीच : महाराष्ट्रातील पहिले शहर


अंबरनाथ : कोरोनाच्या संचारबंदीमुळे सव्वा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या औद्योगिक विभागातील धडधड आता पुन्हा सुरु होऊ लागली आहे. मर्यादित कामगार, स्वच्छता आणि शारीरिक अंतराची पुरेशी काळजी घेत उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत शेकडो कंपन्यांनी आपले कामकाज सुरू केले असून त्यामुळे घरवापसीचे वेध लागलेल्या येथील परप्रांतीय कामगारांनी घरी जाण्याचा विचार सोडून पुन्हा कंपनीत काम करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. महाराष्ट्रातील अंबरनाथ हे असेल कि इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरु झाले आहेत.
संचारबंदीमुळे रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी शेतीबरोबरच औद्योगिक विभागातील कामे पूर्ववत सुरू होणे अत्यावश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात औषध आणि खाद्य निर्मिती उद्योगांव्यतिरिक्त अन्य औद्योगिक विभाग बंद होता. त्यामुळे येथील कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले होते. हातावर पोट असलेल्या कामगारांची अवस्था अतिशय वाईट होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अंबरनाथ औद्योगिक विभागालगत असलेल्या फणशीपाडा ग्रामस्थांनी अशा कामगारांसाठी सामुदायिक अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्रातून दररोज १२०० लोकांना दुपारी जेवण दिले जाते. अजूनही हे अन्नछत्र सुरू आहे. ‘आमा’ या उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने या अन्नछत्रासाठी आवश्यक असलेले धान्य पुरवले जाते. शहरातील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब सारख्या सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीही त्यासाठी यथाशक्ती हातभार लावत आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आनंद नगर औद्योगिक वसाहती मध्ये सुमारे नऊशे प्लॉट आणि अडीचशे गाळे आहेत. कोरोना संचार बंदीच्या तिसऱ्या पर्वात योग्य ती खबरदारी घेऊन अंबरनाथ येथील आनंद नगर औद्योगिक विभागातील बहुतेक कारखान्यांनी त्यांची कामे सुरू केली आहेत. कंपनी सुरू झाल्याने घरवापसीचे वेध लागलेले कामगारही स्थिरावले आहेत. घरी जाण्याचे प्रयत्न सोडून देत त्यांनी काम सुरू केले आहे.
आमच्याकडे कोरोनाच्या संचार बंदी लागू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिकेची ऑर्डर आहे. आम्ही साखळ्या तयार करतो. जगातील २० देशांमध्ये आमचे उत्पादन निर्यात होते. संचारबंदीमुळे मोठी ऑर्डर रद्द होण्याचा धोका होता. अखेर तिसऱ्या संचार बंदी मध्ये रितसर परवानगी घेऊन आम्ही आमचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनीत एकुण ६० कामगार आहेत. मात्र सध्या स्थानिक १८ कामगार रूजू झाले आहेत. जरी अठरा कामगार कामावर असले तरी अन्य कामगार आमच्या बरोबरच आहेत. या संचार बंदीच्या काळात आम्ही त्यांची सर्व जबाबदारी घेतलेली आहे. त्यांना अन्नधान्य, औषधे, पैसे आदी सर्व सोयी सुविधा पुरवत आहोत. कामगार आणि मालक असे आमचे नाते नसून आम्ही एक कौटुंबिक नाते तयार केले असल्याने हे कामगार आपल्या घरी जाण्याचा विचारही मनात येऊ देत नाहीत. आज इतकी वर्षे ते आमच्याकडे काम करीत आहेत. आता या संकट काळी त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडलेले नसल्याचे येथील मेगा लिंक चेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जर्नादन पांडे यांनी सांगितले आहे.
आम्ही कंपनीलगत असलेल्या जांभिवली गावात राहतो. गेल्या आठवड्यात मालकांनी कंपनी सुरू होत असल्याचा निरोप दिला. त्यानुसार आम्ही कंपनीत आलो. काम सुरू झाले आहे. त्यामुळे आता लगेच गावाला जाण्याचा आमचा विचार नाही असे आनंद इंजिनिअरिंग मधील कामगार हनुमंत शंकर धोंडे यांनी सांगितले.
शासनाची रितसर परवानगी घेऊन कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे. शहराबाहेरचे अधिकारी, कर्मचारी येऊशकत नाहीत. त्यामुळे स्थानिक कामगारच येत आहेत. कोव्हीड-१९ बाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन कंपनी व्यवस्थापक करीत आहेत. कारखाने सुरु उद्योजक आणि कामगारांबरोबरच शासनाच्या सुद्धा हिताचे आहे. लाखो रुपयांचा निधी या उद्योगांमधून शासनाच्या तिजोरीत कराच्या रूपातून जमा होत असतो असे आमा या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे, यांनी सांगितले.
संचारबंदीमुळे रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी शेतीबरोबरच औद्योगिक विभागातील कामे पूर्ववत सुरू होणे गरजेचे होते. या कंपन्या हळू हळू सुरु झल्याने रुतलेल अर्थ कारण रुळावर येईल आणि कामगारांचे स्थलांतर हि बंद होण्यास मदत होणार आहे.

 412 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.