तळीरामांच चांगभलं !


आता येणार घरपोच दारू,मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही

मुंबई : राज्य सरकारने मद्यप्रेमींना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. काही अटी-शर्तींवर घरपोच दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने वाइन, बिअरची दुकाने खुली ठेवण्यास काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, दुकानांसमोर मोठी गर्दी होत होती. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे समोर आले होते. याशिवाय पोलीस विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली होती. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत वाइन शॉप, मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवण्यास विरोध झाला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. पण त्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता सर्वत्र घरपोच दारू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
“डिलिव्हरी करणाऱ्यांना ओळखपत्र दिलं जाणार असून बंधनकारक असणार आहे. यासाठी मद्य दुकानदारांनी डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येणाऱ्यांची माहिती देणं आवश्यक आहे. परमिट आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी एक दिवस लागणार असल्यानेच १४ तारखेपासून ही सेवा सुरु करत असल्याची,” माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट ऑनलाइन मिळेल याची सुविधाही उपलब्ध असल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, कंटेनमेंट तसंच रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही. ज्या जिल्ह्यात दुकानं उघडी आहेत तिथेच ही सेवा लागू होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नसल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे. काही जिल्ह्यात मद्याची दुकाने उघडलेली नाही, तिथे ही सेवा सुरु करता येणार नाही. “स्थानिक प्रशासनाने वेगळा निर्णय़ घेतला तर त्याठिकाणी ही सेवा सुरु करता येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सदर आदेशात बदल करण्याचा किंवा तो मागे घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असणार आहे.

 379 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.