गल्लाभरू डॉक्टरांपासून परप्रांतीयांची सुटका

प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत करण्याची राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांकडून घेण्याची अट राज्य सरकारने घेतली. मात्र या निर्णयाचा गैरफायदा काही गल्लाभरू डॉक्टरांनी घेण्यास सुरुवात करत अव्वाच्या सव्वा रक्कम आकरण्यास सुरुवात केल्याने या कामगारांना आणखीनच अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, अडकलेल्या व्यक्तींना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत करण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रवास करु इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची प्रवास सुरु होण्यापुर्वी डिजीटल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी आणि सिम्टोमॅटीक एक्झामीनेशन (रोगलक्षणात्मक तपासणी) होणे गरजेचे आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत ही वैद्यकीय तपासणी पुर्णत: मोफत केली जाईल. किंवा महापालिकांकडून याकामी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्जासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तिंची एकत्रीत यादी प्रमाणीत करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही आजच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीतील व्यक्ती प्रवास करु शकतील.

 403 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.