फुलांचे झाले अश्रू …

फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
बदलापूर : ” अश्रूंची झाली फुले” अशी प्रचलित म्हण आहे. मात्र अंबरनाथ तालुक्यातील फुलांची शेती करणाऱ्यांची “फुलांची झाले अश्रू” असे म्हणावयाची वेळ आली आहे. सिझन मध्ये कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायावर यंदा कोरोनाच्या संचारबंदीने संपूर्ण शेत फुलांनी भरून पहाणार्या या शेतकऱ्यांना, या फुलांचे जागेवरच निर्माल्य पहाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अक्षरशः फुले हातात तर आली नाहीच मात्र मजुरी अंगावर येऊन कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याने हे शेतकरी डोक्याला हात लावून बसले आहेत.
एकीकडे संचारबंदी असूनही जीवनावश्यक धान्य, भाजीपाला आणि फळांची विक्री होत असताना याच शेतमालाचा एक अतिशय महत्वाचा भाग असलेल्या फुल उत्पादकांच्या नशिबी मात्र जीवापाड मेहनत घेऊन जपलेल्या फुलांचे निर्माल्य पाहण्याची वेळ आली आहे. होळीनंतर लगेच कोरोना संकटामुळे आपल्याकडे संचार बंदीचे सावट घोंघावू लागले. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली. सर्वच प्रार्थना स्थळे बंद झाली. तर बारशापासून बाराव्यापर्यंत सर्व कौटुंबिक तसेच राजकीय आणि सामाजिक सार्वजनिक समारंभ रद्द झाल्याने या सोहळ्यांचा अपरिहार्य भाग असलेल्या फुलांचा बाजारच उठला.
वाढदिवस, लग्न समारंभ, तारांकित हॉटेल्समधील मेजवान्या आणि पार्ट्यांची शोभा वाढविण्याचे काम निरनिराळी फुले करीत असतात. वाढदिवसाला इतर भेट वस्तूंसोबत पुष्पगुच्छ दिले जातात. काही तास ते एक दोन दिवसांचे आयुष्य असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांच्या व्यवहारातून दररोज कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असते. मात्र सध्या ही सर्वच व्यवस्था ठप्प झाली आहे.
परंपरागत शेती व्यवसायातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळताना अंबरनाथ तालुक्यातील अनेक कृतिशील शेतकऱयांनी कडधान्य लागवड आणि फळ बागांबरोबरच फुलशेती करायलाही सुरूवात केली. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून फुलशेतीसाठी प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यातून काही शेतकऱ्यांनी काकडा, मोगरा, सोनचाफा, मोगरा, मदनबाण, गुलाब, चमेली, जाई, जुई आदी फुलांची शेती केली. लग्न तसेच इतर तत्सम समारंभांची शोभा वाढविण्यासाठी तसेच हार करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पाच, सहा दिवस टवटवीत राहणारी रंगीबेरंगी जलबेराची फुले पुष्पगुच्छांची शोभा वाढवितात. त्याची लागवड करण्यासाठी हरितगृहाची आवश्यकता असते. तारांकित हॉटेल्स, कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आदी ठिकाणीही गुलाबांबरोबरच जलबेराला मागणी असते.
मोगरा, सोनचाफा, चमेली, डस्टर, जाई, जुई आदी फुलेही मोठ्या प्रमाणात विकली जातात. धार्मिक समारंभात फुलांबरोबरच तुळशीची पानेही मोठ्या प्रमाणात लागतात. मुंबईत दादर आणि कल्याणला फुलांचे घाऊक बाजार भरतात. तिथून उपनगरांमध्ये फुले वितरीत होतात. जलबेराचा अपवाद वगळता इतर सर्व फुलांचे आयुष्य जेमतेम काही तासांचे असते. त्यामुळे ते साठवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे बाजारातही ग्राहकांची फारशी वर्दळ नसेल, तर मिळेल त्या किंमतीला फुले विकावी लागतात. लॉकडाऊनच्या वरवंट्याने अतिशय नाजूक अशा फुलांचा व्यवसाय देशोधडीला लागला आहे.
भाजीपाला, फळे, धान्य हा शेतमाल संचारबंदीच्या काळातही विकला जातोय. त्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मात्र काही प्रमाणात का होईना त्यांना मोबदला मिळतोय. मात्र कोरोना संकटामुळे फुलांच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. त्याचे उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यात घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत. आमची सुमारे पाच एकर फुल शेती आहे. मजूर सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांना मासिक वेतन द्यावे लागत आहे. बागेची देखभाल, दुरूस्तीचा खर्च करावा लागत आहे. आमच्या शेतात बहुतांशी काकडाची शेती आहे. हि फुले काढून उपयोग नसल्याने त्याची पूर्ण शेती जागीच करपून गेली आहे. उत्पादन काहीही नाही आणि खर्च वाढला आहे. हे सर्व नुकसान झाले असल्याचे वांगणी जवळील काराव येथील शेतकरी अशोक बनोटे यांनी सांगितले.
आमच्या कडे गुलाब, चमेली, मदन बाण, मोगरा अशी विविध फुलांची शेती केली आहे. आमच्या कडे फणस आणि चिकूची सुद्धा लागवड केली आहे. यंदा आंबा अजिबात आला नाही तर चिकू प्रचंड येऊन जागीच सडण्याची वेळ आली, तो बाजारात विकता आला नाही तीच अवस्था फुलांची झाली आहे. एकही फुल विकता आले नाही त्यामुळे यंदा पीक येऊनही त्याचे पैशात उत्पादन झालेले नाही आणि याचा विमाही नाही त्यामुळे शासनाने अन्य पिकांप्रमाणे याची नुकसान भरपाई दिली तर थोडा फार हातभार आमच्या आयुष्याला मिळेल अशी प्रतिक्रिया अंबरनाथ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी, देशमुख उद्यानचे मालक रमेश देशमुख यांनी दिली.

 552 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.