लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालयांकडून लूटमार

दिव्यांग संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ठाणे : कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वजण अडकलेले असल्याचा फायदा घेऊन खासगी रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या बाबतीत लूटमार करण्याचे धोरण आखले आहे. असाच अनुभव विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे मोहम्मद यसुीफ मोहम्मद फारुख खान यांना आला आहे. त्यांच्या शरीरात लावलेली एक नळी काढण्यासाठी चक्क दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मोहम्मद युसूफ खान यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेलद्वारे केलेल्या तक्रारीनुसार, ते ८८ टक्के दिव्यांग आहेत. त्यांना मूतखड्याचा विकार झालेला असल्याने लघुशंकेसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्यावर मुंब्रा- कौसा येथील काळसेकर रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी गेलो होतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंर्तगत २ मार्च २०२० रोजी डॉ. सानिश शृंगारपुरे यांच्या अधिपत्याखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी लघवीचा निचरा होण्यासाठी डीजे स्टेंट (कॅथेटर) टाकण्यात आले. मात्र काळसेकर रुग्णालय कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आलेले असल्यामुळे त्यांना येथील जनकल्याण मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी सुरुवातीला ३ हजार रुपयांचा खर्च सांगण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात नळी काढण्यानंतर त्यांना दहा हजार पाचशे रुपयांचे बिल देण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंर्तगत त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्याचे बिल अदा केलेले होते. तरीही ही रक्कम मागण्यात आली. तसेच, पैसे न दिल्यास डिस्चार्ज न देण्याचा इशारा दिला. अखेर काळसेकर रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर हे बिल तीन हजार करण्यात आले. या घटनेमुळे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयामध्ये दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे रुग्णालयता प्रवेश केल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत केवळ त्रासच सहन करावा लागत आहे. या रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय सुविधा मानके, दिव्यांग हक्क कायदा यांचा भंग केला आहे. तरी, सदर प्रकरणाची आपण दखल घेऊन आणीबाणीच्या काळात रुग्णांची लूटमार करणाऱ्या या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खान यांनी केली आहे.

 614 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.