ही वेळ स्पर्धा भरविण्याची नाही


मनसेचे पुष्कराज विचारे यांची ठाणे महापालिकेच्या कोरोना स्पर्धेवर टीका

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कोरोनामुक्त प्रभाग उपक्रमावर मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी प्रश्न उपस्थित केला असून ही वेळ स्पर्धा भरविण्याची नसून प्रत्येक प्रभाग हा कोरोना विरोधातील लढाईसाठी सक्षम बनविण्याची आहे, असा टोला लगावला आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात विचारे यांनी म्हटले आहे, ठाण्यातील जनता मागील ५० दिवसांपासून लॉकडाऊनचे काटेकोर पालन करत आहे. ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळेच अनेक ठिकाणी लॉकडाऊन फसला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिवसभर उघडी असणे आवश्यक असताना काही प्रभागांत वेळा सारख्या बदलण्यात आल्या. काही ठिकाणी केवळ दोन तास वस्तू खरेदी – विक्री केली जात होती. अशा स्थितीत गर्दी होणारच हे प्रशासनाला समजत नाही का?आपल्या अपयशाचे खापर लोकांवर फोडणे ठामपा प्रशासनाने बंद करावे.

होम डिलिव्हरीबाबत सांगितले जाते. पण किती सामान्य माणसांपर्यंत होम डिलिव्हरी पोहचते हा प्रश्न आहे. कागदावर केलेल्या उपाययोजना सत्यात आहेत का? हे तपासण्याची स्पर्धा महापालिकेने घ्यावी, असा उपरोधक टोला विचारे यांनी लगावला आहे. झोपडपट्टी भागातील नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गरिबांना भेडसावत आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. ठामपा हद्दीतील सामान्य माणसाच्या नियमितच्या आजाराचा प्रश्न देखील आहे. त्यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या हे सांगणे आवश्यक असताना स्पर्धा कसल्या भरवत आहात? असा सवाल विचारे यांनी केला आहे. कोरोनामुक्तीच्या लढाईत सामान्य माणूस पहिल्या दिवसापासून लढत आहे, पुढेही लढेल. मात्र त्याला लढण्याची ताकद प्रशासन आणि सरकारने द्यायला हवी, सोयीसुविधा त्याच्या भागात उपलब्ध करून द्यायला हव्यात, सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकीय हेतूने प्रसिद्धीचे स्टंट करू नयेत, असे आवाहनही विचारे यांनी पत्रकात शेवटी केले आहे.

 473 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.