३.६३ लाख ग्राहकांनी स्वतःहून पाठविले वीज मीटर रिडींग

वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मुंबई : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रिडींग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व ‘महावितरण’ मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे.
महावितरणकडे स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील ६९९१२, कल्याण- ५८२१०, भांडूप- ३७५४३, नागपूर- २७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती- २०९४१, जळगाव- १७६६४, औरंगाबाद- १६३७४, अकोला- १३७६७, अमरावती- १३५४०, चंद्रपूर- ८८२४, कोकण- ८५४२, नांदेड- ७३४८, गोंदिया- ७२६८ आणि लातूर परिमंडलामधील ६९६३ वीजग्राहकांचा समावेश आहे.
महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 393 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.