आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राबवला उपक्रम
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची आवश्यकता ओळखून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामार्फत मतदारसंघातील १८ विरंगुळा केंद्रांना प्रत्येकी ५०० किलो तांदूळ व १०० किलो डाळ याप्रमाणे एकूण सुमारे १० टन धान्य मोफत वितरित करण्यात येत आहे. आज जुईनगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामधील ज्येष्ठ नागरिकांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. तसेच बेलापूर गाव ज्येष्ठ नागरिक संस्था, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था सीबीडी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पामबीच सानपाडा, वात्सल्य ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था करावे गाव यांनाही मोफत धान्याचे वितरण करण्यात आले असून उर्वरित विरंगुळा केंद्राना येत्या २ दिवसात धान्य वाटप करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या देशाची संपत्ती असून अशा संकटसमयी त्यांना मदत करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. आपल्या देशावर बिकट संकट आले असताना माझ्या मतदारसंघातील एकही ज्येष्ठ नागरिक असमाधानी राहणार नाही, याची मी स्वतः काळजी घेत असून आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ टन धान्य स्वखर्चाने वाटप करण्यात आले असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
508 total views, 3 views today