मंत्रालयाचे कामकाज बंद असूनही काढले आदेश
जानेवारीतल्या पदोन्नतीची पदस्थापना ३० एप्रिलला
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संकटाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बहुतांष मंत्री, शासकिय कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता दोन हात करत आहे. मात्र राज्याच्या महसूल विभागाला मात्र पदोन्नती दिलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पद स्थापना (पोस्टींग) देण्यासाठी मंत्रालयाचे कामकाज सुरू होण्याची वाटही बघाविशी वाटली नाही. उलट जंतूनाशक फवारणीसाठी मंत्रालय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही या विभागाने थेट पदस्थापनेचे निर्देश काढत संबधितांना हजर होण्याचे आदेशही बजावले.
महसूल विभागाने ३० जानेवारी रोजी ६९ उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती अर्थात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर देण्याचा आदेश काढला. त्यानंतर साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र कोरोना विषाणूचा संभावित धोका टाळण्यासाठी अधिवेशन लवकर गुंडाळण्यात आले. त्यानंतर तब्बल ८ ते १० दिवस मंत्रालयाचे कामकाज नियमित सुरु होते. परंतु त्याकाळात या ६९ अधिकाऱ्यांना पदांचे वाटप आणि त्यांचे नियुक्तीचे ठिकाण कळविण्याची तसदी महसूल विभागाने घेतली नसल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
विशेष म्हणजे या पदस्थापना अर्थात नियुक्तीच्या ठिकाणी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर “गुच्छ” “बॉक्स” आदी गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर आदान-प्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईतील पदांकरीता या गोष्टींचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र २७ एप्रिल रोजी मंत्रालयात कोरोनाबाधीत ४ ते ५ रूग्ण आढळून आल्यानंतर २९ आणि ३० एप्रिल रोजी मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकिय इमारत र्निजंतुकिरणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या दोन दिवासात मंत्रालयाचे कोणतेही शासकिय कामकाज चालणार नसल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी २८ एप्रिल रोजी काढले. तरीही महसूल विगाला अशी कोणती घाई झाली होती की मंत्रालय बंद असताना ६९ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश काढण्याचे अशी चर्चा मंत्रालयातील इतर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच रंगली आहे.
विशेष म्हणजे या पदोन्नतीतील ८ अधिकारी हे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे खाजगी सचिव, ओएसडी म्हणून काम करत आहेत. तर अनेक जण त्या त्या ठिकाणी-विभागात आधीपासूनच कार्यरत आहेत. मग घाई का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
528 total views, 2 views today