त्या १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार

सतत गैरहजर राहिल्यामुळे प्रशासनाची कारवाई

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या कोरोना विभागासह रुग्णालयातील सफाई करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून १३ सफाई कर्मचारी गैरहजर असल्याची बाब उघडकीस आली असून त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येताच, जिल्हा रुग्णालय हे कोविड १९ साठी आरक्षित करण्यात आले. या रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. सध्याच्या घडिला जिल्हा सामान्य रुग्णालयात सात कक्षासह एक अतिदक्षता विभाग कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरु करण्यात आले आहे. या विभागाची नियमितपणे साफसफाई करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, उपलब्ध असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी १३ कर्मचारी हे गेल्या महिन्याभरापासून गैरहजर आहेत. अवघ्या ३० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तीन शिफ्टमध्ये सफाईचे काम करावे लागत आहे. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असून देखील ते आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. याची गांभीर्याने दाखल घेत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या १३ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. मात्र, तरीही ते कर्मचारी कामावर हजर होत नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली

 618 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.