मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार
मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून केंद्र सरकारने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या पर्यटक, कामगार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा जिल्हास्तलांतर करायचे असेल त्यासाठी प्राधिकृत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. मात्र हे आदेश केंद्राने देण्यापूर्वीच राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अधिकार देत यासंदर्भातील माहिती गोळा करण्यास सांगितल्याचे माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्याने दिली. त्याचबरोबर याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात करून याविषयावर चर्चा सुरु केली होती. तसेच राजस्थान सरकारने यासंदर्भात महाराष्ट्रातील काही प्रसारमाध्यमातही जाहीरात प्रकाशित केली होती. केंद्राच्या या निर्णयामुळे मुंबई महानगरातील परप्रांतीय कामगारांचा सरकारवरील बोजा कमी होणार आहे. याशिवाय तेवढीच संख्या या भागातून कमी झाल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना पाठविण्याआधी त्यांची तपासणी करावी. तो व्यक्ती निरोगी असेल तरच त्या व्यक्तीला बसेस मधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी. या सर्वांना रस्त्याने अर्थात बसेसने पोहोचवावे. तत्पूर्वी बसेस सॅनिटायझ करावेत. घरी पोहोचल्यानंतरही सदर व्यक्तीची स्थानिक आरोग्य विभागाकडून तपासणी करावी. तसेच सदर व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाईन करावे. तसेच त्यांना आरोग्य सेतूचा वापर करण्यास प्रोत्साहीत करावेत.
662 total views, 3 views today