कळव्यातील कोरोनामुक्त परिसरासाठी नवी युक्ती

नागरिकांचे कौतुक व सतर्कता बाळगण्यासाठी लढविली शक्कल

महापौर नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीत काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण सापडले होते. परंतु याच ठिकाणी काही परिसरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, याबाबत या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी ठाणे महापालिकेने फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली असून महापौर नरेश म्हस्के व विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी आज या परिसराची पाहणी केली.
कळवा विभागात ज्या ठिकाणी एकही रुग्ण आढळेलला नाही अशा विभागात प्रवेश करताना त्या विभागाच्या प्रवेश द्वारावर ‘एकही कोरोना रुग्ण नसलेल्या अभिमानास्पद परिसरात तुम्ही प्रवेश करत आहात. या परिसरात आपल्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही याची जबाबदारीने काळजी घ्या’ असा फलक लावण्यात आला आहे. तर या विभागातून बाहेर पडताना ‘एकही कोरोना रुग्ण नसलेल्या अभिमानास्पद परिसरातून आपण बाहेर जात आहात. परत येताना कोरोना विषाणू सोबत आणणार नाही याची काळजी घ्या’ असे फलक लावण्यात आले असून या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जेणेकरुन आपला परिसर हा कोरोनामुक्त असून आपण देखील परिसरातून बाहेर जाताना योग्य ती काळजी घ्यावी, सोशल ‍डिस्टन्सींग पाळावे असा संदेश या फलकाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत आहे.

कळव्यातील फुलेनगर परिसर हा संपूर्ण झोपडपट्टी परिसर आहे, या परिसरात नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे या विभागात आजपर्यत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल व त्यांनी आणखी सतर्कता बाळगावी यासाठी असे फलक लावले असल्याचे ही संकल्पना राबविणारे कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी सांगितले. कळव्यातील आणखी ३० विभाग असे आहेत की तेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशा ठिकाणी देखील हे फलक लावले जाणार असल्याचे विश्वनाथ केळकर यांनी नमूद केले.
ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह सर्व यंत्रणा कोरोनामुक्त शहर करण्यासाठी सर्व तऱ्हेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकतेच महापौरांनी देखील नागरिकांना आपणच घराबाहेर पडून आपल्या मरणाला निमंत्रण देवू नका असे भावनिक आवाहन केले होते. तसेच महापालिकेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत विभागवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, या सर्वेक्षणानंतर आलेल्या अहवालानुसार ज्या परिसरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये तसेच त्या परिसरातील व्यक्तींने देखील बाहेर जाताना काळजी घ्यावी यासाठी फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. फुलेनगर परिसरातील नागरिकांनी जे सहकार्य प्रशासनाला केले आहे, त्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी सर्व नागरिकांचे कौतुक करुन त्यांना पुन्हा एकदा घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. यावेळी उपअभियंता भोई व कार्यकारी अभियंता मनोज तायडे हे देखील उपस्थीत होते.

 547 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.