राज्याला एक लाख कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचे शरद पवार यांचे पंतप्रधानांना आवाहन
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ३ लाख ४७ हजार कोटी रूपयांचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची महसूली तूट येणार असल्याने महाराष्ट्राला १ लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली.
राज्यातील आर्थिक स्थितीचा गाडा रूळावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून ९२ हजार कोटी रूपयांचे कर्ज घेण्याचा विचार आहे. यापैकी ५२ हजार कोटी रूपयांचे कर्ज विकास कामासाठी घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यामुळे आणखी १ लाख कोटी रूपयांची कमतरता असून केंद्राने आर्थिक पॅकेज दिल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला पडणारे मोठे भगदाड रोखता येणे शक्य होणार आहे. हे आर्थिक पॅकेज दिल्यास महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाच्या विकासात पुन्हा मोठी भूमिका पार पाडू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याशिवाय नॅशनल स्मॉल सेविंग फंड कडून राज्य सरकारने घेतलेल्या कर्जापोटी दरवर्षी १० हजार ५०० कोटी रूपयांचा हप्ता परतफेडी पोटी दिला जातो. या परतफेडीसह दोन वर्षाची मुदत वाढ देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली असून फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रोलिया, स्पेन आदी देशांनी त्यांच्या देशातील राज्यांकरिता जीडीपीच्या १० टक्के रक्कम त्यांच्या राज्यांना मदतीपोटी दिली आहे. त्याधर्तीवर केंद्र सरकानेही निर्णय घेवून देशातील कोरोनाबाधीत राज्यांना मदत पॅकेजेस आरबीआय बँकेच्या माध्यमातून जाहीर करावीत असे आवाहनही त्यांनी केले
657 total views, 1 views today