कोरोनामुळे ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाची परंपरा यंदा खंडित

१०० व्या वर्षी आदिवासी, गरीब लोकांना धान्य वाटप करून महाराजांना केले अभिवादन

बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाची १०० वर्षाची अविरत परंपरा यंदा कोरोना संचार बंदी मुळे खंडित झाली आहे. यंदा या उत्सवाचे शंभरावे वर्ष होते. देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर बदलापूर गावात आहे. गेली शंभर वर्षे हा शिवजयंतीचा उत्सव चार दिवस यात्रेच्या स्वरूपात साजरा केला जातो. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आदिवासी गरीब कुटुंबाना धान्य वाटप करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
बदलापूर गावातील शिवजयंती उत्सवाची १०० वर्षाची अविरत परंपरा आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सव मंडळाने यंदाच शतक महोत्सवी शिवजयंती उत्सव भव्य प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित अंतर पाळत आमदार किसान कथोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार घालून महाराजांना अभिवादन केले.
अक्षय तृतीयाच्या एक दिवस आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथी नुसार जन्म उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याची बदलापूर गावात परंपरा आहे . बदलापूर गावात महाराजांचा जन्मोत्सव चार दिवस यात्रेच्या स्वरूपात साजरा केला जातो. अश्या प्रकारे फक्त बदलापूर गावातच यात्रेच्या स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. तसेच महाराजांचे देऊळ असणारे बदलापूर देशातील एकमेव गाव आहे. या चार दिवसात भव्य मिरवणूकही काढण्याची परंपरा आहे. या ऐतिहासिक शिवजयंतीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः ३ मे १९२७ रोजी, पांडुरंग भास्कर पालये शास्त्री हे उत्सव समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या विंनतीला मान देवून बदलापुरात उपस्थित राहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ उपस्थित राहिले इतकेच नव्हे तर त्याकाळी ते, निघालेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी सुद्धा झाले होते. बदलापूर गावात जाणाऱ्या मार्गावर असलेल्या उल्हास नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी त्यांनी देणगी सुद्धा दिली होती. हि आठवण आजही बदलापूरकर नागरिकानी आवर्जून जपून ठेवली आहे.
अगदी सुरुवातीला गणेशोत्सव वा नवरात्री उत्सवाप्रमाणे येथे शिवाजी महाराजांची मातीची मूर्ती आणून उत्सव साजरा केला जात असे आणि उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असे. कालांतराने येथे शिवाजी महाराजांचे मंदिर कायम स्वरूपी बांधून त्यात महाराजांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. त्याची विधिवत स्थापनाही करण्यात आली आहे. या शिवजयंतीच्या यात्रेला गावातील माहेरवाशिणी न चुकता माहेरी येत असतात. मिरवणुकीच्या दिवशी गावामध्ये वेगळेच वातावरण असते. बदलापूर गावात मुस्लिम बांधवांची वस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या वस्तीमधील सर्व बंधू भगिनी या उत्सवात उत्साहाने सहभागी होत असतात. या यात्रेतील त्यांची विशिष्ट चवीची कुल्फी प्रसिद्ध आहे.
यंदा या शिवजयंती उत्सवाचे शंभरावे वर्ष असल्याने उत्सव समितीने काही महिन्यांपासून आखणी केली होती. राज्यातील अनेक मोठे नेते, अभिनेते या उत्सवात सहभागी होणार होते. यंदा चार दिवसांचे ऐवजी सात दिवस उत्सव साजरा करण्याचा निर्णय व आयोजन केले होते. मात्र कोरोनाच्या संचार बंदी मुळे यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या प्रमाणे शिवप्रेमींनी सोशल डिस्टिंग्ससिग पाळत हा उत्सव अत्यंत साधे पणाने साजरा केला. आता पुढील वर्षी हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जाणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने जाहीर केले. कोरोना संचार बंदी लागू करण्यात आल्यामुळे आदिवासी कुटुंबांना येणारी अडचण लक्षात घेऊन त्या कुटुंबांना या निमित्ताने धान्य वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांचे सह शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

 531 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.