व्हिएतनाम : अथांग किनारपट्टी आणि अचंबित पर्वतरांगांनी नटलेला देश

जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत १५ व्या नंबर ला असणारा , आणि तब्बल ९७ टक्के एवढी साक्षरता असणारा व्हिएतनाम हा देश दक्षिणपूर्व आशिया मधील सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय श्रीमंत देश म्हणून गणला जातो. अचंबित करणाऱ्या पर्वतरांगा , ३२६० किलोमीटर एवढी अथांग किनारपट्टी लाभलेले नितांत सुंदर निळेशार समुद्रकिनारे , पांढरीशुभ्र वाळू असणारा हा देश काजू , कॉफी आणि तांदूळ या साठी प्रसिद्ध आहे, व्हाईट कॉफी आणि ड्युरियन फळाचा वापर करून बनवलेली व्हिएतनामी कॉफीचे चाहते तर जगभरात पसरले आहेत.

हो ची मिन्ह सिटी व्हिएतनाम पर्यटन विभागाच्या वतीने जगभरातून निवडक २० जणांना नुकतेच विशेष निमंत्रित म्हणून तब्बल आठ दिवस व्हिएतनाम मध्ये बोलावण्यात आले होते. भारतातून हे भाग्य मला लाभले , याबद्दल पर्यटन विभागाचा आणि जागतीक दर्जाच्या वंडेर्लस्ट टिप्सचा मी कायम आभारी राहील. हा देश पर्यटनासाठी कसा आहे , हे जगभरातील पर्यटन प्रेमींना कळावे , हा त्या मागचा त्यांचा उद्देश , त्या साठी तीन दिवसांचे इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्स्पो , असे एक प्रदर्शनही भरवण्यात आले होते. केवळ प्रदर्शनासाठी देखील अन्य काहीजण विविध देशातून आले होते. ज्यामध्ये ट्रॅव्हल एजेंट, पर्यटन विषयक मासिकांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

हे तीन दिवसीय प्रदर्शन झाल्यानंतर , हो ची मिन्ह सिटीतून , आम्हां निवडक २० विशेष निमंत्रितांना दीड तासाच्या विमान प्रवासाने दनांग आणि लँग को या सेंट्रल व्हिएतनाम मधील अत्युत्कृष्ट पर्यटन स्थळी नेण्यात आले. एकमेकां पासून जेमतेम ३४ किलोमीटर च्या अंतरावर असणारी ही दोन्ही ठिकाणं कोस्टल सिटी म्हणून प्रसिद्ध आहेत.

सध्याची हो ची मिन्ह सिटी म्हणजे पुर्वीचे सायगॉन , हे शहर दक्षिण व्हिएतनाम मध्ये येते. अजूनही बहुतांश ठिकाणी सायगॉन हेच नाव प्रचलित आहे. अमेरिके बरोबर सुरू असलेल्या तब्बल २० वर्षांच्या युद्धाच्या आठवणी या शहरात तुम्हांला आढळतात. जगप्रसिद्ध कु ची टनेल ला भेट म्हणजे एका दैदिप्यमान, वैभवशाली आणि झुंजार लढ्या चा इतिहास जाणून घेण्याची मोठी संधीच होती. एक दोन नव्हे तर तब्बल २० वर्षे या देशाने , त्यांच्या सैन्याने , आणि येथील नागरिकांनी बलाढ्य अशा अमेरिकेन सैन्याबरोबर लढा देत त्यांना सळो की पळो केले होते. अमेरिकन सैन्याच्या नाकावर टिच्चून त्यांना माघार घ्यायला लावली होती. जवळपास २०० किलोमीटरचा नेटवर्क असलेला हा भूमिगत कु ची टनेल म्हणजे व्हिएतनाम अमेरिका युद्धाचा चालता बोलता इतिहास आहे. या युद्धाचे वर्णन तिथला गाईड आपल्याला सांगत असताना , याच टनेल मध्ये अनेक व्हिएतनामी मातांनी आपल्या बछड्यांना जन्म दिला हे ऐकताना , आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या लढायां, गनिमीकाव्या चा (Guerrilla Tactics) वापर या सगळ्याचे वर्णन गाईड जेव्हा जोशपूर्ण पध्दतीने करत असतो , तेंव्हा आपल्याला गनिमीकाव्याचे जनक छत्रपती शिवरायांचा इतिहास हमखास आठवतोच.
हो ची मिन्ह सिटीतील इंडीपेडन्स पॅलेस , सेंट्रल पोस्ट ऑफिस , नोट्रे डेम कथेड्रेल , बेन थन मार्केट , वॉकिंग स्ट्रीट , ही सर्वच ठिकाणे तुम्हांला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. वॉर म्युझियम ची दोन तासांची भेट म्हणजे शब्दशः अंगावर काटा उभी करणारी , रक्तरंजीत इतिहास अनुभवण्याची , निःशब्द होऊन फक्त ऐकत राहण्याची भेट ठरते, आणि म्युझियम मधून बाहेर पडताना , आपण लढवय्या व्हिएतनामीजना मनापासून सलाम करतो.

हो ची मिन्ह सिटी पासून दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या , आणि सन २००० मध्ये युनेस्कोने बायोस्पिअर रिजर्व म्हणून जागतिक दर्जाची मान्यता दिलेल्या CanGio Mangrove Forest ला आम्ही भेट दिली. हवेच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या स्पीड बोट मधून दोन तासांच्या धमाल प्रवासाचा आनंद तुम्हांला येथे मिळतो. हो ची मिन्ह सिटीची इकोसिस्टीम कायम उत्तम राहावी यासाठी येथील सरकारने विशेष काळजी घेतली आहे हे आपल्याला या ठिकाणी भेट दिल्यावर जाणवते. या शहराच्या “ग्रीन लंग्ज” असेच या मॅनग्रोव्हजना संबोधले जाते. या पर्यटन स्थळाला त्यांनी मंकी आयलंड असेही नाव दिले आहे.

समुद्राची पातळी वाढत असताना व्हिएतनाम सरकार या मॅनग्रोव्हज च्या रूपाने ग्रीन वॉल्स उभ्या करत आहे. नॅशनल स्ट्रॅटेजी म्हणूनच अस्तित्वात असलेल्या मॅनग्रोव्हजचे जतन आणि त्यांची वाढ करणे यावर व्हिएतनाम सरकारचा भर आहे. याचा फायदा येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना इको टुरिझम व्यवसायाच्या रूपाने झाला आहे. इथे असणाऱ्या नैसर्गीक मॅनग्रोव्हजचा सांभाळ , जतन आणि वाढ या सर्वांची जबाबदारी व्हिएतनाम सरकारच्या बरोबरीनेच आता येथील नागरिकांनी ही घेतली आहे. हा सर्व तब्बल सहा तासांचा थरार अनुभवत असताना ,आपल्याकडे होणाऱ्या मॅनग्रोव्हजची कत्तल ,त्याप्रती असणारी येथील शासन,प्रशासन आणि नागरिकांचीही उदासीनता आठवून आपण बेचैन होतो.

अजय निक्ते
पत्रकार , ट्रॅव्हल ब्लॉगर ,अभिनेते

 482 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.