राज्यातील कोरोना बाधितांना मिळाला दिलासा

‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्र सरकारने मान्यता दिल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी आणि रूग्णांची माहिती जमा करण्यासाठी पुल टेस्टींग करण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राकडे करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारच्या या दोन्ही मागण्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला.
कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यानी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 465 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.