महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा

महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची राज ठाक यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती

मुंबई : राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली.
मुंबईत स्वस्त दरात जेवण देणारी अनेक हॉटेल्स आणि खानावळी आहेत. मात्र ती लॉकडाऊनमुळे बंद आहेत. हा लॉकडाऊन सुरुवातीला ३० मार्च नंतर ३० एप्रिल आणि आता ३ मे पर्यत वाढविण्यात आला. कोरोनामुळे हा लॉकडाऊन आणखी किती काळ वाढेल याचा अंदाज नाही. त्यामुळे आतापर्यंत किती महसूल बुडाला, किती बुडेल याचा अंदाज घ्यावा असे आवाहन करत असेच राहीले तर राज्याची तिजोरी बुडाला जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या तिजोरीत अबकारी करातून दिवसाकाळी १४.३३ कोटी रूपयांचा महसूल जमा होतो. तर महिन्याकाठी १२५० कोटी मिळतात. त्यामुळे दारू पिणाऱ्यांची गय म्हणून नव्हे तर राज्याच्या तिजोरीत पैसा यावा उद्देशाने हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु करावीत अशी मागणी करत या महसूलामुळे अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारकडून कामगारांना मोफत जेवण पुरविण्यात येते, कोरोना विरोधी लढ्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांना पीपीई किट वाटपासाठी पैसे लागणार आहेत. यासाठी हा मिळणारा महसूल खर्च करता येणार आहे. सध्या सर्वच जमिनीचे, स्थावर मालमत्तेचे व्यवहार बंद असल्याने तिजोरीत महसूल येणे अशक्य आहे. त्यामुळे या गोष्टी सुरु केल्यास राज्याच्या तिजोरीत महसूल येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 452 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.