तांदळापासून सॅनिटायजरचा पुनर्विचार करा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी


मुंबई : ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नापसंती दर्शवली आहे. सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारकडून वैयक्तिक स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. त्यासाठी सर्वांनाच हात स्वच्छ ठेवण्याचे, त्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. हे सॅनिटायजर सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे उत्पादन वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने तांदळापासून सॅनिटायजर बनविण्याचा निर्णय घेतला आहे.


सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सॅनिटायजर आवश्यक आहेच, त्याचे उत्पादन करायलाच हवे. मात्र, लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशातील गोरगरीब जनता अन्नासाठी संघर्ष करीत आहे. अशा वेळी आपले सर्वांचे प्राधान्य गरिबांचे पोट भरण्यास असायला हवे. बफर स्टॉकमधील तांदूळ स्थलांतरीत मजुरांना देता येऊ शकतो. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि गोदामांतील तांदूळ गरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
देशातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक कामगार, मजूर अडचणीत आले आहेत. त्यांची उपासमार होत आहे. त्यांना रेशन दुकानांतून पुरेशा प्रमाणात धान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळं सुळे यांच्या या मागणीला महत्त्व आहे.

 533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.