बदलापूरमध्ये वीजेचा खेळखंडोबा

नागरिकांमध्ये प्रचंड चीड : बदलापूर रात्रभर अंधारात : पाणी पुरवठ्यावरही परिणाम

बदलापूर : संचार बंदीमुळे दिवस रात्र नागरिकांना घरात रहावे लागत असल्याने विजेची आवश्यकता अधिक महत्वाची झाली आहे. मात्र बदलापूर शहरातील महावितरणाच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे नागरिकांना दिवस आणि रात्रही अंधारात काढावी लागली. अनेक भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास विजपुरवठा सुरळीत झाला. दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा विपरीत परिणाम पहायला मिळाला. वीज मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आधीच चोवीस तास घरात राहायचे त्यात वीज नसल्याने पाणीही नाही. वीज मंडळाकडून मिळत नसल्याने संतापात भरच पडत आहे.

संचार बंदीच्या काळात संपूर्ण कुटुंब दिवसभर घरातच राहत असल्याने वीज आणि पाण्याची आवश्यकता अधिक लागत आहे. मात्र बदलापूर शहरात महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आणखी वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. रविवारी पूर्व भागात सकाळी साडे १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुरूस्तीच्या कामांसाठी विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्यात दिवस घालवावा लागला. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. मनोरंजनाची साधने ठप्प झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत होते.

पश्चिम भागातही दुपारी १२ ते २ या काळात विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र दिवसभर दुरूस्तीचे काम केल्यानंतर रात्र तरी सुखात जाईल या आशेवर असलेल्या नागरिकांच्या स्वप्नावर पाणी फिरले. दिवसभर वीज पुरवठा खंडीत असताना रात्री उशिरा पुन्हा विजपुरवठा खंडीत झाला होता. बदलापुर पूर्वेकडील कात्रप, शिरगाव या भागात मोरिवली येथून येणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने रात्री अकराच्या सुमारास विजपुरवठा खंडीत झाला होता. त्याचवेळी पूर्वेकडील बेलवली स्मशानभुमीजवळच्या भागातील रोहित्र जळाल्याने आसपासच्या भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला. साडे अकराच्या सुमारास पश्चिमेला विजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत महानगर गॅस पंपाजवळ बिघाड झाल्याने बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, मोहनानंदनगर या भागातही विजपुरवठा खंडीत झाला होता. याच काळात अंबरनाथ शहरात विजपुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले. त्यामुळे दोन्ही शहरातील सुमारे पाच लाख लोकसंख्या रात्रभर अंधारात होती. अंबरनाथमध्ये रात्री उशिरा विजपुरवठा सुरळीत झाला. मात्र बदलापुरात सकाळी ६ च्या सुमारास विजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.

बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज केंद्रालाही खंडीत विजपुरवठ्याचा फटका बसला. वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा करणारी यंत्रणाच ठप्प झाली होती. परिणामी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. कुपनलिकांही विजपुरवठ्याअभावी बंद झाल्याने पर्यायी पाण्याची व्यवस्थाही होऊ शकली नाही. त्यामुळे नागरिकांना वीज आणि पाणी या दोनही अत्यावश्यक सेवांपासून वंचित रहावे लागल्याने प्रचंड चीड व्यक्त होत आहे. वीज मंडळाकडून योग्य वेळी प्रतिसाद मिळाला तर नागरिक सहकार्य करायलाही तयार असतात मात्र वीज मंडळाकडून योग्य व समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणखी संतापात भर पडते. लवकरच हि परिस्थिती सुधारली नाही तर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

 552 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.