वाडिया हॉस्पिटलमध्ये होणार चाचणी
रोज १०० चाचण्या होण्याची क्षमता
ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या अति संपर्कातील संशयित रुग्णांची स्वॅब टेस्टींग करून तात्काळ अहवाल मिळावा याकरिता महापालिकेच्यावतीने वाडिया हॉस्पिटलमध्ये स्वतःची नवीन अत्याधुनिक लॅब आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, स्वॅब टेस्टींगसाठी मुंबईत उपलब्ध असणाऱ्या लॅबमधून आणि काही खासगी लॅबमधून कोरोनाची चाचणी करण्यात येत हती त्यामुळे कधीकधी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. शहरातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची स्वतःची लॅब असावी याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महापौर नरेश म्हस्के हे आग्रही होते. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी याबद्दल युद्धपातळीवर पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू केली आहे.
या प्रयोगशाळेसाठी आयसीएमआर तथा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून प्रयोगशाळेला मान्यता मिळविण्यात आली आहे. या लॅबमध्ये आता शहरातील कोरोना बाधीत रुग्णांचे स्वॅब (नमुना) टेस्टींग होणार आहे. दररोज १०० चाचण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासह या प्रयोगशाळेमध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, रियल टाईम पीसीआर मशीन आदी अत्याधुनिक यंत्रांचा समावेश आहे.
या प्रयोगशाळेमध्ये कोरोना संशयित रुग्णाच्या घशातून स्टीकने स्वॅब (नमुना) घेण्यात येतात. आरटीपीसीआर मशीनमध्ये तपासणीसाठी नमुने टाकताना जंतू मरणार नाहीत तसेच इतर जंतू वाढणार नाहीत याचीदेखील काळजी घेण्यात येणार आहे.
520 total views, 2 views today