तरी सार्वजनिक वाहतूक आणि सणावर बंदी कायम राहणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे.
मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करत टाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचे कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

 618 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.