भाजपच्या वतीने नियोजनबद्ध वाटप
बदलापूर : कोरोनाच्या महामारीला आला घालण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मुरबाड, बदलापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी ग्रामीण विभागातील ९४ हजार ३०३ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुरबाड आणि बदलापूर शहरामधील ३६,४०० लोकांना आतापर्यंत जेवणाची पाकिटे देण्यात आली आहेत.
मुरबाड मतदार संघाचे आमदार आणि भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसन कथोरे यांनी संचारबंदी लागू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यास सुरूवात केली आहे. ४ एप्रिलपासून त्यांनी मदतीचे वाटप सुरू केले. सुरूवातीला ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागातील कातकरी कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर हातावर पोट असलेल्या गोरगरीब घरांमध्ये धान्यवाटप केले गेले. ठिकठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांनी गरजू लोकांच्या याद्या आमदार कार्यालयात आणून दिल्या. त्यानुसार पाकिटे तयार करून गरजूंना देण्यात आली. याशिवाय मुरबाड, बदलापूरमध्ये ४१ हजार ४१५ जणांना भाजपच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
ठाणे ग्रामीण भागात ज्यांच्याकडे शिधावाटप पत्रिका आहे. त्यांना धान्य मिळाले आहे. केवळ धान्य मिळून चालत नाही म्हणून अन्य साहित्य ज्यात तेल, मसाला, मीठ आदींबरोबर बिस्किटेही देण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे शिधावाटप पत्रिका नाही अशांनाही जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. मतदार संघातील कातकरी, आदिवासी, कष्टकरी यांच्या बरोबरच न्हावी, विधवा महिला यांनाही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. संचार बंदीच्या या काळात ग्रामीण भागातील जनतेने कडकडीत बंद पाळला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेत असल्याची माहिती भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांनी दिली
660 total views, 1 views today