‘कम्युनिटी किचन’द्वारे दररोज हजारोंना जेवण

दुपारी आणि संध्याकाळीही सेेवा
शासनाच्या योजनेत अंबरनाथमधील दानशूरांचा हातभार

अंबरनाथ : मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या जिल्ह्यातील आश्रितांसाठी सध्या ठिकठिकाणी सामूहिक भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारचे कम्युनिटी किचन अंबरनाथमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू झाले असून त्या सेवेचे व्यवस्थापन उल्हासनगरमधील सत्संग सेवा केंद्रात महाप्रसाद करण्याचा अनुभव असणारे सिंधी बांधव करीत आहेत. उल्हासनगरमध्ये नेताजी चौकात दररोज चार हजार नागरिकांसाठी जेवण बनविण्याचे काम सुरू असतानाच अंबरनाथ येथील कम्युनिटी किचन चालविण्याची जबाबदारीही या मंडळींनी घेतली आहे.
अंबरनाथमध्ये राहणारे मनोहर चावला गेली अनेक वर्षे उल्हासनगर पाच नंबर कॅम्पमधील चालिया साहब सत्संग परिवारात सलग चाळीस दिवस चालणाऱ्या चालिया महोत्सवात महाप्रसादाची जबाबदारी सांभाळतात. या महोत्सात दररोज हजारो लोकांना जेवण दिले जाते.
संचारबंदी जाहीर झाल्यानंतर उल्हासनगरमध्ये नेताजी चौक इथे तातडीने सामूहिक भोजन व्यवस्था सुरू झाली. तिथे सध्या दुपारी चार हजार लोकांना जेवण दिले जाते. या केंद्राचे व्यवस्थापन सांभाळीत असतानाच अंबरनाथ येथील शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनची व्यवस्थाही ते सांभाळीत आहेत. या केंद्रातून दुपारी आणि संध्याकाळी दररोज प्रत्येकी अडीच हजार लोकांना जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत. तहसीलदार जयराज देशमुख यांनी पुढाकार घेऊन हे सरकारी कम्युनिटी किचन सुरू केले. शासनाच्या वतीने भोजनासाठी तांदुळ आणि डाळीचा पुरवठा केला जाणार आहे. मात्र इतर व्यवस्था स्वयंसेवी संस्था आणि इतर दानशूर
व्यक्तींनी केलेल्या मदतीतूनच करायची आहे. कांदे, बटाटे, तेल, मसाला, जेवण पॅक करण्यासाठी लागणारे बॉक्स हे सारे साहित्य पुरविण्यासाठी अंबरनाथकर यथाशक्ती हातभार लावत आहेत. मात्र या साºया कामांवर देखरेख अनुभवी मनोहर चावला करीत आहेत.
अंबरनाथमधील सूर्योदय सभागृहात पहाटे चार-साडेचार वाजता कम्युनिटी किचनचे काम सुरू होते. साडेदहा ते बारा यावेळेत जेवणाचे बॉक्स भरून ते शहरातील चार वाटप केंद्रांवर रवाना होतात. तिथे एक वाजेपर्यंत सर्व जेवणाची पाकिटे वाटली जातात. पुन्हा संध्याकाळी साडेतीन ते सहा यावेळेत जेवणाची पाकिटे तयार केली जातात. सात वाजता सर्व केंद्रांवर पाकिटे वाटली जातात. आठ वाजेपर्यंत हे सर्व काम संपते.
गेल्या तीन दिवसांपासून कम्युनिटी किचन सुरू झाले आहे. तहसील कार्यालयाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी वाटप कार्यात मदत करीत आहेत. पूर्व विभागातील शिवमंदिर परिसरातील वस्ती, पश्चिम विभागातील बुवापाडा, महात्मा गांधी शाळेजवळील पालिका शाळा याठिकाणी जेवणाची पाकिटे वाटली जात आहेत. गरजेनुसार आणखी केंद्र सुरू करून वाटप केले जाईल, अशी माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.

सकाळी खिचडी, संध्याकाळी पुलाव


सध्या कम्युनिटी किचनमध्ये सकाळी डाळ खिचडी तर संध्याकाळी पुलाव बनवला जात आहे. याच्या जोडीने दोन दिवसांतून एकदा पोळी भाजी देण्याचीही योजना आहे. त्यासाठी सिंधी समाज संघटनेच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी पोळ्या बनवून दरदिवशी किमान एका केंद्रावर पोळीभाजी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मनोहर चावला यांनी सांगितले.

अंबरनाथकर पुढे सरसावले

कम्युनिटी किचनची चोख व्यवस्था पाहून मदत करण्यासाठी अनेक अंबरनाथकर पुढे येऊ लागले आहेत. अंबरनाथ जयहिंद बँकेच्या संचालिका रूपा देसाई- जगताप यांनी स्वयंस्फूर्तीने या केंद्राला बँकेच्या वतीने तसेच उद्योजक संघटनेच्या वतीने मदत देऊकेली आहे. शहरातील ज्येष्ठ उद्योजक आणि अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक विलास देसाई यांनीही गरजू अंबरनाथकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उद्योजिका सुमती पाटील आदी अनेक जण या कम्युनिटी किचनच्या व्यवस्थेत आपापले योगदान देत आहेत.

 555 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.