अखेर कामोठे एमजीएमला हॉस्पिटलला कोविडचा दर्जा

दीडशे ते अडीचशे खाटा आरक्षित,
वीस अतिदक्षता खाटांसह १० व्हेंटिलेटर

आमदार, खासदार, पालकमंत्री रमले बैठकीत तर पनवेल संघर्ष समितीची प्रत्यक्ष कृती

पनवेल: एका एका संख्येने वाढता वाढता कोरोना रुग्णांचा आकडा बत्तीसवर गेला आणि शहरांची धाकधुक वाढू लागली. लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष जाणवत असताना पनवेल संघर्ष समितीने दूरदृष्टीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला कोविड दर्जा देण्याची मागणी करून जिल्हा ते राज्याच्या आरोग्य खात्याकडे पाठपुरावा केला. त्या मागणीला यश आले असून अडीचशे खाटांच्या दालनाला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज परवानगी दिली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण हळुहळु वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांची व्यवस्था करून कोविड रुग्णांसाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. तिकडे आता ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापुढे पनवेल महापालिका वगळता रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी रुग्ण आढळल्यास येथे आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि उलवे येथील ४ तर उरण येथील २ रुग्णांची भर्ती करण्यात आली. जास्त रुग्ण वाढल्यास वैद्यकीय यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून अतिशय दूरदृष्टीने पनवेल संघर्ष समितीचे व्यासंगी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आदींशी पत्रव्यवहार केला होता.
त्यानंतर राज्याचे सहआयुक्त डॉ. अंबर्डेकर यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये डॉ. गवई यांनी पनवेल संघर्ष समितीच्या मागणीवर चर्चा केली. डॉ. अंबर्डेकर यांनी त्यांना हिरवा कंदील दिला होता. त्याच वेळी जिल्ह्याच्या निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मिनी बैनाडे यांनीही संघर्ष समितीच्या मागणी नुसार एमजीएम रुग्णालयाला कोविडचा दर्जा देवून कांतीलाल कडू यांना कळविण्याचे निर्देश डॉ. गवई यांना दिले होते. मात्र, आज जिल्हाधिकारी चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये हा निर्णय घेतला. दीडशे खाटांची कामोठे एमजीएममध्ये कोरोना रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ती पुढे अडीचशे खाटांपर्यंत वाढवण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यात अतिदक्षता विभागात वीस खाटांची १० व्हेंटिलेटरसह व्यवस्था करण्यात आली आहे. उरण ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी आणि पनवेल महापालिकेचे प्रभारी अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांच्याकडे त्या हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात आली आहे. पनवेल संघर्ष समितीने जिल्हातील लोकप्रतिनिधींनाही सामजिक कामात मागे सोडले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, कळंबोली- रोडपालीनजिकच्या पोलिस मुख्यालयानजिकच्या स्वास्थ्य हॉस्पिटलमध्येही ६० खोल्यांमध्ये १२० खाटांचे नियोजन करून पनवेल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नखाते यांच्यावर चौधरी यांनी जबाबदारी सोपविली आहे.

आता वाढीव निधीसाठी प्रयत्न – कडू

उपजिल्हा आणि एमजीएम रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत. रुग्ण वाढत राहिल्यास त्यांच्या उपचारासाठी पीपीई किटसह निधीची गरज लागणार आहे. तो निधी राज्य शासनाकडून मिळवून महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी पनवेल संघर्ष समिती प्रयत्न करेल, अशी माहिती कांतीलाल कडू यांनी दिली.

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.