ठाण्यात कोरोनाशी लढणार्‍या पोलिसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मॉस्कीटो किटचे वाटप

ठाणे : सध्या लॉकडाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर पडू नयेत, यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देतायत. मात्र कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस बांधवांना रात्रीच्या वेळी डासांच्या उच्छादाला सामोरं जावं लागते. ठाणे शहरातील नाक्यानाक्यावरील पोलिसांचा हा त्रास लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रात्रभर रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना अनोख्या मॉस्कीटो किटचे वाटप केले. पोलीस बांधव रात्रभर नाकाबंदी करत असताना त्यांना सध्या डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कोरोनाशी लढताना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पोलिसांना होऊ नयेत, यासाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे आणि प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी ठाणे शहरात विविध ठिकाणी रात्रभर तैनात असलेल्या पोलिसांना डास मारण्याची रॅकेट, ओडोमॉस, मच्छर अगरबत्ती आदींचा समावेश असलेल्या मॉस्कीटो किटचे वाटप केले.
सोबतच रात्रीच्या वेळी पोलिसांसाठी चहा, बिस्किट, पाणी आदींचा पुरवठा महाराष्ट्र सैनिक यावेळी करत आहेत. पोलीसांना डास चावल्यानंतर मलेरिया, डेंग्यू झाल्यास रोगप्रतिकार क्षमता कमकुवत झाल्यास कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. पोलीस बांधव हे आपल्या सुरक्षिततेसाठी तैनात असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं ही आपली जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्य असल्याचे मत जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले.

 491 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.