कंत्राटी , ठोक आणि रोजंदारीचे वेतन तात्काळ अदा करा
आमदार गणेश नाईक यांची महापौर आणि पालिका आयुक्तांना सूचना
नवी मुंबई : आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य खात्यातील डॉक्टर परिचारिका, तसेच इतर संवर्गातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता कवच योजना लागू करावी. अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना ९ एप्रिल रोजी लेखी पत्र पाठवून केली आहे. तसेच कोरोना आपत्तीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असणारे कंत्राटी , ठोक आणि रोजंदारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे थकित मासिक वेतन तात्काळ अदा करण्यात यावे , अशी सूचना देखील आमदार नाईक यांनी केलेली आहे.
नवी मुंबईत कोरोना ला प्रतिबंध करण्यासाठी पालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा लढते आहे. दुर्दैवाने जर आरोग्य खात्यातील डॉक्टर परिचारिका इतर संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांना कोरोना ची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने देखील या घटकांसाठी सामाजिक सुरक्षा कवच योजना लागू केलेली आहे. महापालिकेने देखील एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये किंवा त्याच्या वारसा पैकी एकाला महापालिकेत नोकरी आणि ७५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी , अशी सूचना आमदार नाईक यांनी केली आहे.
आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी, ठोक आणि रोजंदारी कामगार शहरामध्ये संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा नित्यनेमाने आणि वेळेवर देत आहेत. मात्र त्यांचे मासिक वेतन थकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मासिक वेतन लवकर -लवकर करून या घटकांचे मनोबल उंच ठेवावे, अशी सूचना देखील आमदार नाईक यांनी केली आहे. आमदार नाईक यांच्या मागणीनुसार महापौर सुतार यांनी आयुक्त मिसाळ यांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
521 total views, 1 views today