पनवेल उपजिल्हा रूग्णालयासाठी २०० पीपीई किट उपलब्ध

पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनंतर प्रशासनाला जाग

पनवेल : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. परंतु, त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यापासून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई आणि महापालिका आयुक्तांकडे पीपीई किटसाठी कैफियत मांडली होती. त्यानुसार त्यांना दोन्ही आस्थापनांनी मिळून दोनशे पीपीई किट दिले आहेत. संघर्ष समितीच्या मागणीमुळे तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांसहित कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने पनवेलला वेढा घातला आहे. कोरोनाचा मुकाबळा करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयाला कोविड-१९ दर्जा देण्यात आला आहे.या रुग्णालयात सव्वाशे जण कार्यरत आहेत. त्यामध्ये १८ डॉक्टर, ४१ परिचारिका, २७ स्वच्छता कर्मचारी, ९ सुरक्षा रक्षक, ८ लॅब टेक्निशिएन, २ क्ष-किरण तज्ज्ञ, १ फिजिओथेरेफिस्ट, १ आहार तज्ज्ञ, ४ कार्यालयीन कर्मचारी, १ शिपाई, ३ कक्ष सेवक, २ मलेरिया तज्ज्ञ, २ रक्त साठा कर्मचारी, ३ औषधं निर्माण अधिकारी आणि १० शाळा तपासणी तज्ज्ञांचा समावेश आहे.
हे सर्व जण कोरोना रूग्णांच्या सतत संपर्कात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नावर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे मागणी करणारे पत्र पाठविताच, त्यांनी प्रत्येकी शंभर असे दोनशे पीपीई किट तात्काळ रूग्णालयाकडे पाठविले आहेत. त्यामुळे रूग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीपीई किट उपलब्ध करून दिल्यामुळे दोन्ही प्रशासनाचे पनवेल संघर्ष समितीने आभार मानले आहेत.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.