भाजप-आरपीआय युतीच्या नगरसेवकांचा मदतीचा हात

पनवेल महापालिकेतील सर्व नगरसेवकांचे दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत

पनवेल : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप-आरपीआय युतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे ५४ नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यावर शासनस्तरावर आर्थिक मंदीची परिस्थिती येऊ लागली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात १७ कोरोना रुग्ण आढळल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन नगरसेवक, उद्योजक आणि नागरिकांना केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक जण आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. पनवेल महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आरपीआय युतीच्या सर्व नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीसाठी देत असल्याचे जाहीर करून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत आणि नितीन पाटील यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.

 459 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.