कल्याणच्या महापौरही वैद्यकीय सेवेसाठी पुढे सरसावल्या

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला विनिता राणे यांचा प्रतिसाद

कल्याण : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी आता आरोग्य कर्मचारी अपुरे पडतील काय ? असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्राला आपल्यासारख्या योद्ध्यांची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आरोग्य कर्मचाऱ्यांना बुधवारी केले होते. त्यांच्या या आवाहनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा रुग्णसेवा करायची आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

महापौर राणे ह्या महापालिकेची निवडणूक लढण्याआधी मुंबई महानगरपालिकेच्या बी. वाय. एल नायर रुग्णालयात ३२ वर्षे परिचारिका म्हणून कार्य करत होत्या. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी हे काम सोडले होते. आता कोरोनाच्या संकटसमयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याची इच्छा दर्शवली. त्यांनी तसे पत्र आयुक्तांना देऊन कायदेशीर अनुमतीदेखील मागितली आहे.

रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थितीत माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स, परिचारिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. असे असताना मी पेशाने परिचारिका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नसल्याचे त्या म्हणाल्या. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी मी पुन्हा परिचारिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी सेवा देणार, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

 735 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.