विद्यार्थी व शिक्षकांमधील संवाद वाढविण्यासाठी जि.प.माध्यमिक विभागाचा पुढाकार
ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच विद्यार्थ्यांना त्याची लागण होवू नये, याकरिता लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित, खासगी संस्थांच्या सर्व माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील संवाद कमी झाला आहे. हा संवाद लॉक डाऊनच्या काळात देखील सुरु राहावा यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे. यासाठी झूम ऍपची मदत घेण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यात कोरोना प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.
राज्यात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता राज्य शासनाच्या वतीने मार्च महिन्यात २२ तारखेपासूनच लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यात या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या देखील कमी करण्यात आली. तसेच दहावीचा एक पेपर देखील पुढे ढकलण्यात आला आहे. तर, दुसरीकडे अनुदानित व विना अनुदानित, खासगी संस्थांच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संवाद देखील दुरावला आहे. हा दुरावा कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी झूम ऍप द्वारे क्षेत्रीय अधिकारी व अनुदानित व विना अनुदानित, खासगी संस्थांच्या मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांशी या ॲपचे मदतीने संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील दुरावलेला संवाद पुन्हा सुरु होण्यास मदत होईल. तसेच या संवादातून विद्यार्थ्यांशी कोणत्या विषयावर चर्चा करावी याची सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांमार्फत दिली जाणार आहे.यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती करावी, त्यांचे मनोबल वाढवावे, त्यांना आनंददायी कृती अभ्यासकृती या विषयांचा समावेश असल्याची माहिती बडे यांनी दिली. हा उपक्रम लाॅक डाऊन कालावधीत तसेच नंतरही ठाणे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
558 total views, 1 views today