पनवेलमध्ये डॉक्टरांचा जीव टांगणाला

पीपीटी किटचा तुटवडाः  ४ व्हेंटिलेटर मृतावस्थेत

पनवेलः पनवेल उपजिल्हा रूग्णालयाला कोविड-१९ दर्जा दिल्यानंतर आज २२ रूग्ण तिथे उपचार घेत आहेत. दुसरीकडे त्यांची दक्षता घेणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, रूग्णवाहिका चालक ते अगदी द्वारपालाची भूमिका निभावणारे सुरक्षा रक्षकांचीही सुरक्षाच धोक्यात आली असून पीपीटी किटचा तुटवडा जाणवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे इमरर्जन्सीसाठी लागणारे व्हेंटिलेटर सलाईनवर असल्याने ही यंत्रणा त्वरीत कार्यान्वित करण्यासह पीपीटी किट उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना साकडे घातले आहे.
 पनवेल शहरातील नागरी वस्तीत असलेल्या पनवेल उपजिल्हा रूग्णलयाला कोविड रूग्णालयचा दर्जा दिल्यानंतर तेथील सर्वसामान्यांसाठीची ओपीडी बंद करून त्यांच्यासाठी पनवेल महापालिकेने विभागीय स्तरावर ओपीडी व्यवस्था सुरू केली आहे. ही जमेची बाजू असली तरी कोविडचे थैमान पाहता तेथील डॉक्टर, परिचारिका, वॉड बॉय, सुरक्षा रक्षक आणि रूग्णवाहिका चालकांसाठी पीपीटी किटचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांच्या जिवीताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
 मुंबईतील व्होकार्ट हॉस्पीटलमध्ये कोविडवर उपचार करणार्‍या ५० डॉक्टरांना कोरोना झाल्याने वैद्यकीय क्षेत्रच किती असुरक्षित आहे, याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. नवी मुंबईतील फोर्टिज हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या खारघरच्या महिला डॉक्टरांना कोरोना झाला आहे. त्यांच्यापासून त्यांच्या पतीलाही लागण झाल्याची घटना ताजी असताना, कोरोना यंत्रणेचा अंग ठरलेल्या सुरक्षा रक्षक ते डॉक्टरांपर्यंतच्या सर्व घटकांना त्वरीच पीपीटी किटची उपलब्धता करून द्यावी. तसेच मृतावस्थेत असलेले चारही व्हेंटिलेटर कार्यन्वित करून घेण्याची तातडीची मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
 याशिवाय कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कामोठे येथील एमजीएमच्या विस्तीर्ण जागेत पसरलेल्या अद्यावत रूग्णालयाला कोविड दर्जा देवून तिथे रूग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करावी, अशी महत्वपूर्ण मागणीही कांतीलाल कडू यांनी डॉ. गवई यांच्याकडे केली आहे.
 या पत्राच्या प्रति, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजय मेहता, सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आदींना मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

 470 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.