राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ८६८

७० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयात ७१ तर बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

दरम्यान, आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.
१) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ४१ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता.
२) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते .
३) मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणा-या ८० वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला.
४) नवी मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते.
५) मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका ९ महिन्याच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे) मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला.
६) मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी संध्याकाळी एका ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता.
७) महानगरपालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील
मुंबई ५२६ ( मृत्यू ३४)
पुणे (शहर व ग्रामीण भाग)१४१ (मृत्यू ०५)
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ८५ (मृत्यू ०९)
नागपूर १७
अहमदनगर २३
यवतमाळ ४
उस्मानाबाद ३
लातूर ८
औरंगाबाद १० ( मृत्यू ०१)
बुलढाणा ५ ( मृत्यू ०१)
सातारा ५
जळगाव २ ( मृत्यू ०१)
कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती (मृत्यू ०१), हिंगोली, जालना प्रत्येकी १
इतर राज्य – २
एकूण- ८६८ त्यापैकी ७० जणांना घरी सोडले तर ५२ जणांचा मृत्यू

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.