गरज पडल्यास गृहनिर्माण विभागातर्फे तब्बल १४,००० घरे कोरोना रुग्णांसाठी

गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांना आयसोलेट (विलगीकरण) आणि क्वारंटाईन करण्यासाठी गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. रूग्णांना आयसोलेट आणि क्वारंटाईन करण्यासाठी या घरांची मोठी मदत होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने चोख कामगिरी बजावत अनेक ठिकाणी कोरोनावर उपचार करणार्या रूग्णालयांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधातील या लढ्यात आता गृहनिर्माण खातेही ताकदीने उतरले आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाईन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याने उभा करण्याची तयारी केली आहे.रूग्णांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्यासाठी ही घरे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

आज डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये डाॅ. आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. यावेळी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना रूग्णांना आरसोलेट तसेच क्वारंटाईन करण्यासाठी तत्काळ १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
त्यांनी सांगितले की, जर रुग्णालयांची कमतरता भासत असेल तर गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी १४००० घरांची तयारी ठेवली आहे.या घरांचा रूग्ण क्वारंटाईन करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अगदीच वेळ हाताच्या बाहेर जायला आली तर अजून ह्यामध्ये १०००० घरांची व्यवस्थाही करु शकतो, असेही ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

 373 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.