ठाणे महानगरपालिका करत आहे सफाई कामगारांच्या जीवाशी खेळ

या कामगारांना जर एखादा दगा फटका झाला, तर जबाबदार कोण?

संदीप पाचंगे,मयूर तळेकर यांचा पालिकेला सवाल

ठाणे : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आपल्या दाराशी येत असून या युध्द जन्य परिस्थितीत देखील ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम सफाई कामगार करत आहेत.मात्र याच सफाई कामगारांच्या जीवाशी पालिका खेळत आहे अश्या कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत.
खोपट येथील बाटा कंपाऊंड जवळ असणाऱ्या “अमृत घंटागाडी प्रकल्प”येथील सफाई कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने,मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे व मनविसे विभाग सचिव मयूर तळेकर यांनी पुढाकार घेऊन या कामगारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
आतापर्यंत पालिकेकडून ३ कामगारांमध्ये सॅनिटायझरची फक्त एकच बाटली,हलक्या दर्जाचे हँडग्लोज देण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून मास्क देखील वाटण्यात आले नाहीत अशी तक्रार सफाई कामगार विशाल डेंगळे यांनी केली आहे.
या कामगार वर्गाचा थेट घाणीशी संबंध येत असून त्यांना कचऱ्यात उतरून काम करावे लागते.यामुळे त्यांना आवश्यक वस्तू मिळायलाच हव्यात.प्रशासन जर नागरिकांकडून फंड मागत आहे तर या कामगारांना मूलभूत सोई सुविधांचा तुटवडा का? जर एखाद्या कामगाराला दगा फटका झाला, तर त्याला जबाबदार कोण असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिकेला केला आहे.

 621 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.