रेशन कार्डाचा रंग न पाहता धान्यवाटप करा

आमदार किसन कथोरे यांचे आवाहन

आमदार निधीतून ५० लाख रूपये देणार

बदलापूर : करोना संकटामुळे देशातील सर्वच व्यवहार ठप्प आहेत. या अडचणीच्या काळात गोरगरीबांसाठी शासनाने विनामूल्य धान्यवाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यासाठी असलेली उत्पन्नाची गट व्यवहार्य नाही. सध्याच्या धोरणानुसार अनेक गरीब या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका आहे. कारण शहरी भागात वार्षिक ५९ हजार रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या तसेच ग्रामीण भागात वार्षिक ४४ हजार रूपये उत्पन्न असणाऱ्या या कुटुंबांना केशरी रंगाचे कार्ड देण्यात आले आहेत. सरकारी धोरणानुसार मदत करायचे ठरवले तर या वर्गात मोडणारी लाखो कुटुंबे मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ‘करोना’च्या पाश्र्वाभूमीवर शासनाने तातडीने आपले धोरण बदलून सर्वांना मदत द्याावी, असे आवाहन मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे. मतदार संघातील सर्व गरजूंना तातडीने जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रूपयांचा निधी वर्ग करून घ्यावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर नगरपालिका हद्दीतील काही झोपडपट्टीमधील अनेकांकडे स्वत:चे रेशनकार्डही नाही. त्याचप्रमाणे मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या तिन्ही तालुक्यात आदिवासी आणि कातकऱ्यांच्या वस्त्या आहेत. हातावर पोट असलेल्या या माणसांची उपासमार होऊ नये म्हणून तातडीने सरसकट मदत दिली जावी. रेशन कार्ड कोणत्या रंगाचे आहे, कार्ड आहे की नाही, याची तपासणी करू नये, असेही त्यांनी सुचविले आहे.

सरकारी निकष कालबाह्य

रास्त दरात धान्य मिळण्यासाठी उत्पन्नासाठी सरकारने हे निकष ठरवले आहेत, ते कालबाह्य आहेत. शहरी भागात बहुतेक गरीब कुटुंबेही सुमारे आठ ते दहा हजार रूपये महिना कमवितात. ग्रामीण भागातही भूमीहीन कातकरी कुटुंबे वगळता इतर ग्रामस्थ शेती, पूरक उद्योग आणि नोकरीतून सहजपणे वार्षिक ४४ हजारांहून अधिक उत्पन्न मिळवितात. आताच्या महागाईच्या काळात हा निकष गरीबांवर अन्याय करणारे आहेत. विद्यामान सरकारी धोरणानुसार मदत मिळण्यास पात्र नसणारी मुरबाड तालुक्यात १४ हजार ८४६ केशरी कार्ड कुटुंबे आहेत. या कार्डावर रेशन मिळणाऱ्या नागरिकांची संख्या ५९ हजार ३१८ इतकी आहे. कल्याण तालुक्यात केशरी कार्डधारक ५ हजार ९२९ कुटुंबे असून लाभार्थी ३७ हजार ४०४ आहेत. अंबरनाथ ग्रामीण आणि बदलापूर शहरात सात हजार ९८० केशरी कार्डधारक असून लाभार्थी ३९ हजार ७८० आहेत. या सर्वांना मदत मिळावी, अशी आमदार किसन कथोरे यांची भूमिका असून त्यासाठी त्यांनी आमदार निधीतून ५० लाख रूपये घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

 2,736 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.