महाराष्ट्रात निजामुद्दीनची पुनरावृत्ती होवू देवू नका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या जनतेला साकडे

मुंबई: ‘करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून येत्या १४ एप्रिल रोजी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारे सामूहिक सोहळे लांबणीवर टाकावेत व मुस्लिमांनी ८ एप्रिलचा ‘शब-ए-बरात’चा विधी आपल्या घरात राहूनच करावा. महाराष्ट्रात निजामुद्दीनची पुनरावृत्ती होऊ देऊ नका’ अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी केली.

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आज तिसऱ्यांदा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी जमातने आयोजित केलेल्या ‘मरकज’मुळे सध्या देशभरात करोनाचा धोका वाढला आहे. ‘मरकज’हून परतलेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सर्व धर्मीयांना सामूहिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले. ‘‘तबलिगी जमात’’ने निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता, असे पवार म्हणाले. येत्या काळातही काही कार्यक्रम आहेत. आठ एप्रिलला मुस्लिमांची ‘शब-ए-बरात’ आहे. हयात नसलेल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा हा दिवस असतो. मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येऊन हा विधी करतात. मात्र, यावेळी घरात राहूनच तो करण्याचा विचार व्हायला हवा. घरातच नमाज अदा करावा’, असे ते म्हणाले.

येत्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या सोहळ्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आपण करणारच आहोत. मात्र, त्या दिवशी होणाऱ्या सामूहिक सोहळ्यांचं आयोजन लांबणीवर टाकता येईल का, याचा निर्णय जाणकारांनी घ्यावा. एरवी आपण बाबासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम महिनाभर करत असतो. त्यामुळं फारशी अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.

“राज्य सरकारने रोगांवर आवर घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य यंत्रणांना लोकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर पोलीस दल धोका पत्करून काम करत आहे. पण, काही लोक लॉकडाउन पाळत नाही. त्याची किंमत सगळ्यांना द्यावी लागते. लॉकडाउन न पाळणाऱ्यांविरोधात पोलिसांना भूमिका घ्यावी लागत आहे. सध्या दोन आठवड्याचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, लोकांनी काळजी घेतली नाही आणि करोनाचा संसर्ग वाढत गेला. तर लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारला घ्यावीच लागेल. त्यामुळे कृपा करून ही वेळ येऊ नये म्हणून आपण नियमांचे काटेकोरपणाने पालन करा,” असे पवार म्हणाले.

‘सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील अजूनही अनेक लोकं नियम पायदळी तुडवून अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी पोलिसांनी सक्तीची भूमिका घेतली, तर त्यांच्यावर टीका होते. पण पोलिसांना सक्तीची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांना तशी भूमिका घ्यावीच लागेल’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार यांनी लोकांशी तिसऱ्यांदा संवाद केला. ‘पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले होण्याचे, त्यांच्यावर दगडफेक होण्याचे, त्यांच्याशी वाद घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. असे करणे चुकीचे आहे. पोलीस देखील माणूसच असून आपल्या सुरक्षेसाठीच ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे त्यांना लोकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे’, असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

 452 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.